पुढारी ऑनलाईन डेस्क : मुक चित्रपटापासून सुरू झालेला चित्रपटाचाचा प्रवास कृष्णधवल, रंगीत ७० mm असा करत थ्री डी आणि ८ डी पर्यंत आज पोहोचला आहे. तसेच दूरचित्रवाणीसह संपूर्ण मनोरंजन विश्व सातत्याने होत असलेल्या संशोधनामुळे बदलत गेले आहे. मोबाईलच्या जमान्यात तर आज चित्रपट पाहण्यासाठी गेम्स खेळण्यासाठी तळहाता एवढ्या डिस्प्लेचा आपण वापर करत आहोत. तंत्रज्ञान अतिशय पुढे जात असताना आपण सध्या व्हर्च्युअल रियालिटी ( VR) तंत्रज्ञानापर्यंत पोहोचलो आहोत. आता याच तंत्रज्ञानावर आधारित भारतातील पहिल्या चित्रपटाची निर्मिती होत आहे. हा चित्रपट स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा ऐतिहासिक चारित्रपट असणार आहे, अशी माहिती संतोष रासकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी प्रसिद्ध अभिनेते आणि या चित्रपटाचे लेखक – दिग्दर्शक योगेश सोमण, रवी बारापत्रे उपस्थित होते.
यावेळी बोलताना संतोष रासकर म्हणाले, वास्तवाचा आभास निर्माण करू शकणाऱ्या व्हर्च्युअल रियालिटी तंत्रज्ञाच्या मदतीने जगात काही चित्रपट निर्माण करण्यात आले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जगाला ओळख करून देताना आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन योगेश सोमण करणार आहेत. अॅनिमेटर चंद्रकांत पाटील चित्रपटाचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहेत. बाळू काटे, संतोष जाधव, उमेश कोकाटे आणि अंशूल रासकर हे चित्रपटाची तांत्रिक बाजू सांभाळणार आहेत.
लेखक, दिग्दर्शक योगेश सोमण म्हणाले, सावरकर यांच्या जीवनावरील या ४५ मिनिटांच्या व्हर्चुअल रिअल चित्रपटात स्वा. विनायक दामोदर सावरकर यांना दोन जन्मठेपांची शिक्षा झाली होती. पैकी १९११ ते १९२१ या काळात सावरकर पोर्ट ब्लेअर वरील सेल्युलर जेल येथे बंदीवासात होते. सेल्युलर जेलमध्ये सावरकर बंधूंनी अनन्वित अत्याचार सहन केले, त्याशिवाय सावरकरांनी राजबद्यांची क्रांतिकारकांची संघटना बांधली, साक्षरतेचा प्रसार केला, हिंदू शुद्धीकरणाची मोहीम राबवली, इतकंच नाही तर पहिल्या महायुद्धाच्या काळात युरोपातील अभिनव भारतच्या क्रांतिकारकांनी सावरकरांची मुक्तता करण्यासाठी एमडेन नावाची युद्ध नौका धाडली होती. त्या सुमारास सावरकरांनी मार्सेलीस सारखा निसटण्याचा प्रयत्न केला असेल का ? हे सगळं चित्रण आमच्या या ४५ मिनिटांच्या चित्रपटात बघायला मिळेल.