'समोरचा जेवढा खट, अस्मी तेवढीच तिखट', शितलीची नवी मालिका | पुढारी

'समोरचा जेवढा खट, अस्मी तेवढीच तिखट', शितलीची नवी मालिका

पुढारी ऑनलाईन डेस्क : लवंगी मिरची मालिकेबद्दल अभिनेत्री शिवानी बावकर (Shivani Baokar) म्हणते- या मालिकेबद्दल सांगायचे झाले तर, लवंगी मिरची हे शीर्षकच माझ्या व्यक्तिरेखेबद्दल बोलत आहे. जशी लवंगी मिरची खूप तिखट असते आणि जे पात्र अस्मी मी साकारत आहे ते देखील खूप तिखट आहे. अस्मीचा या मालिकेमध्ये एक डायलॉग आहे “समोरचा जेवढा खट, अस्मी तेवढीच तिखट”. म्हणजे जर अस्मीच्या तुम्ही वाकड्यात शिरलात तर तुमच खरं नाही. अस्मी जितकी तीक्ष्ण आहे तितकीच ती जबाबदार आहे, आणि तिची ही वागणूक तिच्या जबाबदाऱ्यांमधून येते आणि तुम्ही ही मालिका बघाल तेव्हा तुम्हाला याबद्दल अधिक लक्षात येईल. (Shivani Baokar)

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शिवानी म्हणाली- या मालिकेत मी अस्मी नावाची भूमिका साकारत आहे. प्रोमोमध्ये तुम्ही बघाल की तिची आई हे तिचं जग आहे. ती तिच्या आईच्या बाजूने उभी राहण्यास कधीही चुकत नाही, ती नेहमीच तिच्या आईचे रक्षण करते. तिची आई स्वभावाने अतिशय निरागस आहे. आणि तिने स्वतःची एक खानावळ उभी केली आहे. तिच्या आधीच्या प्रवासात तिला खूप अडथळे आले, तिला तीन मुली आहेत तरीही तिने एकटीने स्वकर्तृत्वावर खानावळ उभी केली. ती निरागस असल्यामुळे लोक तिचा गैरफायदा घेऊ शकतात. तिला काहीही बोलू शकतात. अस्मी तिथे आहे म्हणून तिची आई आणि तिच्या दोन बहिणींना काळजी नाही कारण त्यांना माहित आहे की घरात कोणीतरी आहे जो त्यांचे रक्षण करेल.

या मालिकेत कोणीही पुरुष व्यक्ती नाही. सर्व स्त्री सहकालाकार आहेत. याविषयी शिवानी म्हणते की- स्त्रियांची टीम तयार झाली तर मज्जाच येते. जसा ट्रेनमध्ये लेडीज स्पेशल डब्बा असतो, तसाच आमच्याकडे एक लेडीज स्पेशल माहोल असतो.

शिवानी म्हणाली-मी या आधी झी मराठीवरच ‘लागीर झाल जी’ मालिकेत काम केलंय आणि ती मालिका खूप गाजली. ही माझी झी मराठीवरची दुसरी मालिका आहे. देवाच्या कृपेने सर्व काही माझ्या इच्छेनुसार सुरु आहे. प्रेक्षकांनी मला खूप प्रेम आणि चांगला प्रतिसाद दिला आहे. माझी “लवंगी मिरची” ही नवीन मालिका प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.

Back to top button