पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता शाहरुख खानचा 'पठाण' ( Pathaan ) चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी थिअटरमध्ये रिलीज होताच एकामागून एक रेकॉर्ड तोडत आहे. चार वर्षांनंतर शाहरुख खानचे मोठ्या पडदयावर पुनरागमन झाल्याने चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईतून दिसून येत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या रिलीजनंतर ३ दिवसांनी कमाईचे आकडे समोर येत आहेत. देशात 'पठाण' ने नुकतेच १६० कोटींचा टप्पा पार केला आहे. कमाईचे आकडे असेच राहिले तर हा चित्रपट जगभरात लवकरच ३०० कोटींचा टप्पा पार करेल, असा अंदाज चित्रपट विश्लेषक तरूण आदर्श यांनी व्यक्त केला आहे.
'पठाण' ( Pathaan ) २५ जानेवारीला देशभरात थिअटरमध्ये रिलीज झाला. हा चित्रपट रिलीज होण्याच्या आधी वादात सापडला होता. मात्र, सध्या शाहरूखच्या चाहत्यांची तुफान गर्दी थिअटरमध्ये पाहायला मिळत आहेत. पठाणच्या कमाईचे आकडे समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसांत पठाणने देशात रेकॉर्डब्रेक कमाई करत १६० कोटी टप्पा पार केला आहे. जगभरात हाच आकडा २७५ कोटींपर्यत पोहोचला आहे. चित्रपटाने चौथ्या दिवशी अशीच कामगिरी कायम ठेवल्यास जगभरात ३०० कोटींचा टप्पा पार करण्यात यशस्वी होवू शकेल, असे तरूण आदर्श यांनी म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पठाण चित्रपटाने देशातंर्गत पहिल्या दिवशी ५७ कोटी, दुस-या दिवशी ७०.५० कोटी आणि तिसर्या दिवशी ३६ कोटी कमाई केली आहे. म्हणजे, एकूण १६३ .५० कोटींची भरघोस कमाई केली आहे. तर जगभरात २८० ते २९० कोटींचा आकडा समोर आला आहे. निर्मात्यांनीही लवकरच हा चित्रपट ३०० कोटींचा आकडा पार करणार असल्याचे म्हटलं आहे.
साऊथ अभिनेता यशचा 'केजीएफ चॅप्टर २' ने तिसऱ्या दिवशी १४३. ६४ कोटी कमावले होते. या आकड्यावरून 'पठाण'ने 'केजीएफ चॅप्टर २' मागे टाकल्याचे निदर्शनास येत आहे. पठाणमध्ये शाहरुखसोबत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोनने स्क्रिन शेअर केली आहे.
हेही वाचा :