‘मन होते कधी उनाड’ अल्बम भेटीला | पुढारी

'मन होते कधी उनाड' अल्बम भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : अवघ्या जगाला कवेत घेणाऱ्या स्वप्नांना धुमारे फुटण्याचं वय म्हणजे तारुण्य! पण याहीपलीकडे जाऊन प्रेमासारख्या अवखळ भावनांची संवेदनशीलता अत्युच्च पातळीवर नेऊन ठेवणारं वय म्हणजे तारुण्य. अगदी प्रत्येकाच्याच मनात कुठे ना कुठे एक अवखळ कोपरा असतोच. त्याच अवखळ कोपऱ्याला साद घालणारा नवा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, तो म्हणजे ‘मन होते कधी उनाड!’ प्रत्येकाच्याच मनातली ही अवखळ भावना या अल्बममधून अगदी अलगदपणे प्रेक्षकांच्या ह्रदयाचा ठाव घेते आणि मनाच्या त्याच अवखळ कोपऱ्यात जाऊन विसावते. आणि याला कारण म्हणजे या अल्बममधल्या गाण्यांना लाभलेला तनुजा मेहता यांचा चिरतरुण जादुई आवाज!

तनुजा मेहता यांना त्यांच्या ‘का कळेना’ या अल्बमसाठी २०१९च्या दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. २०२० सालात याच पुरस्कारासाठी त्यांना ‘तेरी चाहत में’ या अल्बममधील सुमधुर गाण्यांसाठी नामांकन मिळालं होतं. याशिवाय तनुजा मेहतानी तब्बल ७ भारतीय भाषांमधून डबिंगही केलं आहे.

दिग्दर्शक रोहन सातघरे यांच्या अनोख्या शैलीचा मिडास टच या अल्बमसाठी लाभला आहे. संगीतकार प्रविण कुवर, ज्यांनी अनेक हिट गाण्यांना संगीत दिलं आहे. त्यांनी मन उनाड या गाण्याचं संगीत केलं आहे.

कौतुक शिरोडकर यांनी लिहिलेली ‘मन होत कधी उनाड’ अल्बममधील गाणी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल समीक्षा वव्हाळ हिच्यावर चित्रीत करण्यात आली आहेत. ओंकार मनवाल यांची कोरिओग्राफी तर आशिष पांडेंनी व्हिडीओग्राफी केलेल्या या गाण्यांचं संकलन स्वप्नील जाधव यांनी केलं आहे.

Back to top button