Raj Kundra case : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्यासह पूनम पांडे, शर्लिन चोप्राला जामीन मंजूर | पुढारी

Raj Kundra case : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्यासह पूनम पांडे, शर्लिन चोप्राला जामीन मंजूर

पुढारी ऑनलाईन डेस्क : पोर्नोग्राफी केसप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. राज कुंद्रा (Raj Kundra case ) याच्यासह अभिनेत्री पूनम पांडे, शर्लिन चोप्रा यांनादेखील जामीन मिळाला आहे.

‘पोर्नोग्राफी’ प्रकरणात गंभीर आरोप झालेल्या राज कुंद्रा, पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मंजूर केला. पॉर्न व्हिडिओची निर्मिती व त्याचे वितरण केल्याचा गुन्हा कुंद्रा याच्यावर दाखल आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी राज कुंद्रा याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. या पार्श्वभूमीवर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. कुंद्रा हा प्रसिद्ध सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने कुंद्राच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले आहे. पोर्नोग्राफीक व्हिडिओ तयार करून त्याचे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर वितरण करणे, तसेच पंचतारांकित हॉटेलमध्ये पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रा यांना घेऊन अश्लील व्हिडिओची निर्मिती केल्याचे कुंद्राविरोधातील दोषारोपपत्रात म्हटले आहे. तर अश्लील कृत्यात सामील झाल्याचा आरोप पांडे आणि चोप्रा यांच्यावर आहे. वादी-प्रतिवादींचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर वरील तिघांना अटकपूर्व जामीन देण्यास काही हरकत नाही, अशी टिप्पणी न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठाने केली.

पोर्न व्हिडिओ बनवणे आणि अश्लिलता पसरवणे या प्रकरणात या सर्वांची नावे आली होती. कोर्टाने म्हटलं की, सर्व आरोपींना तपासात सहकार्य करायला हवे. गरज पडल्यास तपासात सहभागी व्हायला पाहिजे. या केसमध्ये फेब्रुवारीमध्ये शर्लिन चोप्राला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला होता. शर्लिनच्या अटकेवर कोर्टाने स्थगिती दिली होती.

मागील महिन्यात दाखल चार्जशीट

मागील महिन्यात मुंबई सायबर क्राईम पोलिसांनी पोर्नोग्राफी कंटेंट प्रकरणी राज कुंद्रासह सर्व आरोपींविरोधात कोर्टात १००० पानांहून अधिक चार्जशीट दाखल केली होती. या चार्जशीट पोलिसांनी दावा केला होता की, राज कुंद्राने हॉटेलमध्ये पोर्नोग्राफी कंटेंट शूट केलं होतं. पैसे कमवण्यासाठी वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करण्यात आलं होतं. यामध्ये सांगण्यात आलं होतं की, राज कुंद्राने पूनम पांडे, शर्लिन चोप्रासोबत चित्रपट शूट केलं होतं.

राज कुंद्राचे वकील काय म्हणाले होते?

चार्जशीट दाखल झाल्यानंतर राज कुंद्राचे वकील म्हणाले होते की, याविषयी मीडियाकडूनचं समजलं आहे. त्यांचं म्हणणं होतं की. कोर्टात हजर होऊन चार्जशीटची कॉपी घेतील. या दरम्यान वकीलने हेदेखील सांगितलं होतं की, एफआयआर आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये ज्या आरोपांचा उल्लेख केला होता, त्याच्याशी माझ्या क्लाइंटचा कोणताही संबंध नाही.

या प्रकरणात राज कुंद्राला तुरुंगातही जावं लागलं होतं. जुलैमध्ये राजला अटक करण्यात आली होती. दोन महिन्यांनतर त्याला जामीन मिळाला होता.

Back to top button