सलग दुसऱ्या वर्षी अभिनेत्री अक्षया गुरवचा चित्रपट इफ्फी महोत्सवात | पुढारी

सलग दुसऱ्या वर्षी अभिनेत्री अक्षया गुरवचा चित्रपट इफ्फी महोत्सवात

पुढारी ऑनलाईन डेस्क : फेस्टिवल्स हे जगभरातल्या सिनेरसिकांची कौतुक मिळण्याचं ठिकाण असतं. कलाकारांसाठी आपला सिनेमा फेस्टिवल्सना निवडला जाणं म्हणजे, सिनेक्षेत्रातील विविध मान्यवरांपर्यंत पोहचण्याचं व्यासपीठ असतं. अभिनेत्री अक्षया गुरवचा ‘फ्रेम’ हा सिनेमा नुकताच भारतातील सर्वात मोठा फिल्म फेस्टिवल ‘इफ्फी’ गोवा मध्ये दाखवण्यात आला. सलग दोन वर्षे अक्षयाचे सिनेमा ‘इफ्फी’ला दाखवण्यात आले आहेत. मालिकांपासून सुरु केलाला अक्षयाचा प्रवास आता चित्रपटांमध्ये सुरु आहे. रिणवायली, बिटर स्वीट (कडू गोड), फ्रेम हे वेगळ्या विषयाचे सिनेमा अक्षयाने केले आहेत.
‘बिटर स्वीट ‘हा सिनेमा गेल्या वर्षी इफ्फीला निवडला गेला होता. त्यावेळी अक्षया तिकडे गेली होती. यंदा ‘फ्रेम’ हा सिनेमा इफ्फीला दाखवला गेला. याबदद्ल बोलताना अक्षया सांगते,”प्रत्येक कलाकाराला वाटत असतं की आपलं मोठ्या स्तरावर कौतुक व्हावं. गेल्या वर्षी बिटर स्वीट (कडू गोड ) हा सिनेमा विविध फेस्टिवल्सना दाखवण्यात आला होता, तसाच तो ‘इफ्फी’लाही दाखवण्यात आला. इफ्फीसारखा फेस्टिवल खूप महत्वाचा आहे, जिथे जगभरातील सिनेरसिक आणि कलाकार उपस्थित असतात, तुमची कलाकृती बघतात. यंदा इफ्फीला मी उपस्थित राहू नाही शकले. पण माझ्या टीमकडून ‘फ्रेम’ या सिनेमा बद्दलच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

‘फ्रेम’ या फिल्मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, असं माझ्या टीमकडून मला कळलं. त्यामुळे मलाही हा सिनेमा पाहायाची उत्सुकता निर्माण झाली आहे.” नागराज मंजुळे यांची निर्मीती असलेला फ्रेम हा सिनेमा विक्रम पटवर्धन यांनी दिग्दर्शित केला आहे. यात अमेय वाध आणि अक्षया गुरव यांच्या मुख्य भूमिका आहेत.

‘फ्रेम’ या सिनेमाबद्दल सांगताना अक्षया म्हणते, “बिटर स्वीटपेक्षा फ्रेममध्ये माझी विरुद्ध भूमिका आहे. ‘बिटरस्वीट”मध्ये मी ऊसतोडणी कामगाराच्या भूमिकेत होते. तर यात मॉडर्न लूकची भूमिका आहे. या सिनेमात मी पत्रकाराच्या भूमिकेत आहे. त्यामुळे या भूमिकेचं वेगळं आव्हान माझ्यासमोर होतं. “

आत्तापर्यंत अक्षयाने वेगवेगळ्या विषयाचे सिनेमा केले आहेत, “आत्तापर्यंत सिनेमांनी मला निवडलं आहे. पण सिनेमात माझी भूमिका किती लांबीची आहे याचा विचार न करता, मी माझी भूमिका कशी आहे, भूमिका किती स्ट्राँग आहे याचा विचार केला आहे.”

अक्षया आता समीत कक्कड यांचा ‘रानटी’ आणि सुजय डहाकेचा ‘श्यामची आई’ हा सिनेमा करते आहे. या पुढे वेगवेगळ्या विषयाचे सिनेमा करायची अक्षयाची इच्छा आहे.

Back to top button