Kanatara :’कंतारा’समोर ‘डॉक्टरजी’, गॉडफादर’, ‘विक्रम वेधा’ क्लीनबोल्ड | पुढारी

Kanatara :'कंतारा'समोर 'डॉक्टरजी', गॉडफादर', 'विक्रम वेधा' क्लीनबोल्ड

पुढारी ऑनलाईन डेस्क : डॉक्टर जी, पोन्नयान सेल्वन, गॉडफादर आणि विक्रम वेधा हे चित्रपट थिएटरमध्ये सुरू आहेत. सुरुवातीच्या आघाडीनंतर डॉक्टर जी संथ गतीने चालत आहे. त्याचवेळी, पोनियन सेल्वनच्या कमाईतही घट झाली आहे. गॉडफादर आणि विक्रम वेधाची अवस्था अत्यंत वाईट आहे. हे दोन्ही चित्रपट तिकीट खिडकीवर अपयशी ठरले आहेत. त्या तुलनेत कंताराची कहाणी खूप जबरदस्त आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रियादेखील चांगल्या आहेत. सगळीकडे  कंताराची (Kanatara) चर्चा होतेय. रिपोर्ट्सनुसार, होम्बले चित्रपट बॅनर अंतर्गत १६ कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट झालाय. पण, आता लवकरच हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट होऊ शकतो. चित्रपटाची हिंदी बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत ४० ते ५० टक्के वाढ झाली आहे. (Kanatara)

कन्नड चित्रपट कंताराने दक्षिणेत चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटाला दक्षिणेत मिळालेले यश पाहून निर्मात्यांनी हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला जो यशस्वी ठरला. साऊथनंतर हा चित्रपट हिंदीतही धमाल करत आहे. १९ व्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर सुरुवातीच्या आकडेवारीनुसार कंताराने मंगळवारी एकूण आठ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यानंतर या चित्रपटाची आतापर्यंत एकूण कमाई १२७.१९ कोटी रुपये झाली आहे.

पोन्नियन सेल्वन

PS-१ च्या सततच्या चांगल्या कामगिरीनंतर आता या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण होत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या १९ व्या दिवसाचे आकडेही समोर आले आहेत. वीकेंडनंतर या चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे. मंगळवारी आलेल्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार या चित्रपटाचे कलेक्शन १.५० कोटी रुपये झाले आहे. PS-१ ची आतापर्यंत एकूण कमाई २५१.२५ कोटी रुपये झाली आहे.

गॉडफादर

चिरंजीवी आणि सलमान खान स्टारर चित्रपट ‘गॉडफादर’ रिलीज होऊन १५ दिवस उलटले आहेत. दोन्ही सुपरस्टार असूनही हा चित्रपट प्रेक्षकांना आवडत नाही. प्राथमिक आकडेवारीनुसार, या चित्रपटाने मंगळवारी ५० लाखांचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाचे एकूण कलेक्शन ७२.०५ कोटी रुपये झाले आहे.

डॉक्टर जी

‘डॉक्टर जी’ प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अयशस्वी होताना दिसत आहे. अनुभूती कश्यप दिग्दर्शित ‘डॉक्टर जी’ने पहिल्या दिवशी ३.८ कोटी रुपयांची कमाई केली होती. १४ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार मंगळवारी आणखी घसरण झाली आहे. चित्रपटाने पाचव्या दिवशी केवळ १.५० कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यानुसार या चित्रपटाने आतापर्यंत एकूण १८.१७ कोटींचा व्यवसाय केला आहे.

विक्रम वेधा

पुष्कर आणि गायत्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘विक्रम वेधा’ हा याच नावाच्या साऊथच्या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. आर माधवन आणि विजय सेतुपती स्टारर साऊथच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पण हिंदी रिमेक लोकांची मने जिंकण्यात अयशस्वी ठरत आहे. चित्रपटाच्या १९ व्या दिवशीच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, सुरुवातीच्या आकडेवारीनुसार चित्रपटाने सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कमी कमाई केली आहे. सोमवारी जिथे चित्रपटाने ३८ लाखांचे कलेक्शन केले होते. तिथे मंगळवारी ३५ लाखांची कमाई केली. चित्रपटाची एकूण कमाई आतापर्यंत ७७.३२ कोटींवर गेली आहे.

Back to top button