

पुढारी ऑनलाईन डेस्क : यावर्षी ऑस्करमध्ये एन्ट्री होणारा गुजराती चित्रपट 'छेलो शो' (Chhello Show) चा बालकलाकार राहुल कोली (Rahul Koli Death) चे निधन झाले. आजाराने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण, नेमका त्याला कोणता आजार होता, याविषयी माहिती मिळालेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल कोली (Rahul Koli Death) चे निधन ब्लड कॅन्सरने अहमदाबादमध्ये झाले. राहुलच्या निधनाचे वृत्त समोर येताच प्रत्येक जण दु:खी आहे. तीन भाऊ-बहिणींमध्ये राहुल सर्वात मोठा होता. राहुल कोलीचे वडील ऑटो रिक्षा चालवतात.
रिपोर्ट्सनुसार, राहुल कोलीच्या वडिलांनी सांगितलं की, राहुलला २ ऑक्टोबरपासून ताप आला होता. त्याने परिवारासोबत नाश्ता केला आणि काही तासांनंतर त्याने तीन वेळा रक्ताची उल्टी केली. यानंतर राहुलचे निधन झाले. राहुलचे वडील म्हणाले की, तो खूप खुश होता आणि नेहमी म्हणायचा की, १४ ऑक्टोबरनंतर (चित्रपट रिलीज डेट) आपलं आयुष्य बदलेल. पण, नशीबात वेगळं होतं. चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच राहुल कोलीने जगाचा निरोप घेतला.
गुजराती ड्रामा चित्रपट 'छेलो शो' चे दिग्दर्शन पान नलिनने केलं आहे. चित्रपटात भाविन रबारी, भावेश श्रीमाली, ऋचा मीणा, दीपेन रावल आणि परेश मेहता मुख्य भूमिकेत असतील. चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर ट्रिबेका चित्रपट महोत्सवात १० जून, २०२१ रोजी झाला होता.
चित्रपटाची कहाणी गुजरातच्या सौराष्ट्रातील एक गाव चलालापासून सुरू होते. या गावात राहणाऱ्या एका ९ वर्षाच्य़ा अवतीभोवती फिरणारी ही कथा आहे. त्याला चित्रपट पाहणं फार आवडतं. हा मुलगा जेव्हा पहिल्यांदा थिएटरमध्ये चित्रपट पाहतो, तेव्हा त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलते.