मंचर : आदिवासी प्रकल्प कार्यालय पातळीवरील मागण्या मान्य; विद्यार्थ्यांचे आंदोलन तूर्त स्थगित | पुढारी

मंचर : आदिवासी प्रकल्प कार्यालय पातळीवरील मागण्या मान्य; विद्यार्थ्यांचे आंदोलन तूर्त स्थगित

मंचर; पुढारी वृत्तसेवा: शासकीय आदिवासी वसतिगृहातील विविध समस्यांबाबत झालेल्या चर्चेत घोडेगाव येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयपातळीवरील मागण्या मान्य करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. ही माहिती स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अविनाश गवारी यांनी बुधवारी (दि. 21) दिली. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या पुणे जिल्हा समितीच्या वतीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव येथे मंगळवारी (दि. 20) मोर्चा काढण्यात आला होता. बसस्थानक ते प्रकल्पाधिकारी कार्यालय अशी रॅली या वेळी काढण्यात आली होती. त्यानंतर कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करीत विद्यार्थ्यांनी आदिवासी प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्यांचे त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधले होते.

त्यानंतर रात्री उशिरा प्रकल्पाधिकारी बळवंत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस सहायक प्रकल्पाधिकारी के. बी. खेडकर, शिक्षण विभागाचे सहायक प्रकल्पाधिकारी के. एन. जोगदंड, व्ही. टी. भुजबळ, कार्यालयीन अधीक्षक वाय. ए. खंडारे, प्र. शिक्षण विस्ताराधिकारी एस. के. दुरगुडे, लिपिक ए. यू. करंजकर तसेच स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अविनाश गवारी, जिल्हा सचिव नवनाथ मोरे, राज्य सचिव मंडळ सदस्य विलास साबळे, राज्य समिती सदस्य संदीप मरभळ, जिल्हा उपाध्यक्ष रूपाली खमसे आदींसह वसतिगृह विद्यार्थी प्रतिनिधींचा समावेश होता.

या वेळी अर्ज केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वसतिगृह प्रवेश देण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत कार्यवाही केली जाईल, डीबीटी व भत्ता वाढविण्यासाठी वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव पाठविला असून, त्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे, वसतिगृहात अभ्यासिका, ग्रंथालय, संगणक लॅब व जिम आदी सुविधा 15 दिवसांत उपलब्ध करून दिल्या जातील, थकीत शिष्यवृत्ती व स्वयम् योजनेची रक्कम मिळण्यासाठी वरिष्ठपातळीवर पाठपुरावा करणार, ज्या वसतिगृहात अंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था नाही तेथे 10 दिवसांत पर्यायी व्यवस्था केली जाणार आदी मागण्या मंजूर करण्यात आल्या. या आंदोलनात जिल्हा कोसाध्यक्ष बाळकृष्ण गवारी, जिल्हा सहसचिव प्रवीण गवारी, रोहिदास फलके, कांचन साबळे, मीनेश मेंगाळ, धनश्री हिले, यश मराडे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

Back to top button