पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि स्क्रीन रायटर महेश भट्ट (HBD Mahesh Bhatt) यांचा आज ७४ वा वाढदिवस आहे. त्यांनी अनेक चित्रपट दिले आहेत. अनेक वर्षे बॉलीवूड इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवल्यानंतर महेश भट्ट यांचा दबादबा अद्यापही कायम आहे. त्यांचा जन्म २० सप्टेंबर, १९४८ रोजी नानाभाई भट्ट आणि शिरीन मोहम्मद अली यांच्या घरी झाला. सुरुवातीचे शिक्षाण डॉन बॉस्को हायस्कूल, माटुंगा येथून घेतले. पैशांसाठी त्यांनी आपल्या शालेय जीवनापासून नोकरी करणे सुरू केलं होतं. वयाच्या २० व्या वर्षी जाहिरातींसाठी लिहिणं सुरु केलं. आपल्या करिअरच्या सुरुवातीला त्यांनी स्मिता पाटील आणि विनोद खन्ना यांचा सेक्रेटरी म्हणून काम केलं. 'मंजिलें और भी हैं' चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून डायरेक्टोरियल करिअर सुरू केलं होतं. त्यांच्या आयुष्याशी निगडित असे काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, ज्या कदाचित खूप कमी लोकांना माहिती असतील. (HBD Mahesh Bhatt)
बॉलीवूडची आयकॉनिक डान्सर हेलनच्या यशस्वी कारकिर्दीमागे महेश भट्ट यांचा हात असल्याचे म्हटले जाते. ८० च्या दशकात प्रसिद्ध नृत्यांगना हेलनचे राज्य बॉलीवूड इंडस्ट्रीवर चालत असे. तिला अनेक डान्स नंबरसाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. महेश भट्ट यांच्या 'लहू के दो रंग'मध्ये काम करण्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे.
१९८५ मध्ये ऑस्करसाठी ऑफिशियल एन्ट्री मिळवणारा महेश भट्ट यांचा चित्रपट सारांश हा भारतातील पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाची सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी निवड झाली होती.
महेश भट्ट कॉलेजमध्ये असताना लॉरियन ब्राइट नावाच्या मुलीच्या प्रेमात पडले होते. लग्नानंतर लोरियनचे नाव बदलून किरण भट्ट ठेवण्यात आले. किरण ही पूजा भट्ट आणि राहुल भट्ट यांची आई आहे. दरम्यान, महेश भट्ट यांचे परवीन बॉबीसोबत अफेअर होते. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाला. काही काळानंतर त्याचे परवीनसोबतचे संबंधही बिघडले.
त्यानंतर महेश भट्ट यांच्या आयुष्यात सोनी राजदान आली. सोनीसोबत प्रेमसंबंध असताना महेश आणि किरण एकत्र राहत होते. त्यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला नाही. पुढे महेश यांनी सोनी राजदानशी लग्न केले. महेश भट्ट आणि सोनी राजदान यांना आलिया आणि शाहीन या दोन मुली आहेत.
महेश भट्ट अनेकदा वादात सापडले आहेत. त्यापैकी एक आहे- महेश भट्ट यांनी आपली मुलगी पूजा भट्टचा किस घेतल्याचा प्रकार. महेश भट्ट यांनी एका मासिकासाठी पूजा भट्टसोबत लिप किस करताना फोटोशूट केले होते. यानंतर बरीच टीका झाली होती. एका मुलाखतीत महेश भट्ट यांनी त्यांच्या मुलीबद्दल सांगितले होते की, जर पूजा भट्ट त्यांची मुलगी नसती तर त्यांनी तिच्याशी लग्न केले असते. मात्र, महेश भट्ट कितीही वादात सापडले असले तरी ते त्यांना गांभीर्याने घेत नाहीत. आजही ते प्रत्येक मुद्द्यावर आपले मत स्पष्टपणे मांडतात.
महेश भट्ट हे भारतातील यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला दिले. दिवंगत अभिनेत्री परवीन बाबी यांची आठवण करून देताना ते म्हणाले होते की, तिच्या यशस्वी करिअरमागे या अभिनेत्रीचा हात आहे.