नाशिक : दोन महिन्यांत शहरातील आठ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू, डेंग्यूचे 'इतके' रुग्ण | पुढारी

नाशिक : दोन महिन्यांत शहरातील आठ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू, डेंग्यूचे 'इतके' रुग्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वाइन फ्लू व साथरोगाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली असून, आतापर्यंत नाशिकमध्ये उपचार घेणार्‍या 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नाशिक शहरातील आठ, नाशिक ग्रामीणमधील पाच तर नाशिक शहरात उपचारार्थ आलेल्या जिल्हाबाह्य नऊ जणांचा समावेश आहे. गेल्या 19 दिवसांत शहरातील स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या 12 ने वाढून 144 वर पोहोचली आहे.

गेल्या दोन अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाचा जोर कमी होत नाही तोच आता स्वाइन फ्लूसह इतरही साथरोगांच्या आजारांनी उसळी घेतली आहे. जूनपर्यंत स्वाइन फ्लूचा उद्रेक फारसा दिसून येत नव्हता. पावसाळ्यामुळे विविध ठिकाणी पाण्याचे साठे वाढल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे जूनपासून ते आतापर्यंत या आजाराच्या रुणांमध्येही मोठी वाढ झाली आहे. शहरात जूनमध्ये दोन, जुलै महिन्यात 28, ऑगस्टमध्ये 102 तर सप्टेंबरच्या 19 दिवसांतच 12 अशा प्रकारे 144 स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागातील स्वाइन फ्लूग्रस्तांचा आकडा 81 वर पोहोचला आहे. शहरी भागात ऑगस्टमध्ये सहा जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. सप्टेंबरमध्ये कामटवाडे येथील 54 वर्षीय महिला तर मखमलाबाद रोड परिसरातील स्वामी समर्थ केंद्र परिसरातील 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा या आजाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आठवर गेली असून, ग्रामीण भागातील कळवण, निफाड व नाशिक तालुक्यातील लाखलगाव भागात प्रत्येकी एकाचा तर चांदवडमधील दोघांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. याखेरीज पालघरमधील एक, नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील तीन, संगमनेरमधील दोन, श्रीरामपूर येथील एक तर जळगाव आणि वाशिम जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा नाशिकमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.

स्वाइन फ्लू आणि इतरही साथरोगांची लक्षणे दिसू लागताच नागरिकांनी घाबरून न जाता तत्काळ वैद्यकीय उपचार घेतले पाहिजे. अंगावर दुखणे काढू नये. तसेच आजारी असताना गर्दीच्या ठिकाणी न जाता घरी योग्य तेवढा आराम करावा. जेणेकरून आजार आटोक्यात राहील.
– डॉ. बापूसाहेब नागरगोजे,
वैद्यकीय अधीक्षक, मनपा

डेंग्यूचेही 230 रुग्ण
स्वाइन फ्लूसह शहरात डेंग्यू आजाराचीही लागण वाढली आहे. आतापर्यंत या आजाराचे 230 रुग्ण आढळून आले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या 19 दिवसांतच या आजाराचे 58 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच चिकुनगुनियाचे 18 रुग्ण सध्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button