Jacqueline Fernandez : जॅकलिनला पुन्हा समन्स, १९ सप्टेंबरला चौकशी होणार | पुढारी

Jacqueline Fernandez : जॅकलिनला पुन्हा समन्स, १९ सप्टेंबरला चौकशी होणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुकेश चंद्रशेखरच्या कथित खंडणी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) पुन्हा एकदा समन्स पाठवण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी सोमवारी, १९ सप्टेंबरला तिला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आर्थिक गुन्हे शाखेसमोर (EOW) ती हजर होणार आहे. याआधी बुधवारी ती ईओडब्ल्यूसमोर हजर झाली होती. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पिंकी इराणी जॅकलिनसोबत होती. इराणीनेच जॅकलिनची सुकेश चंद्रशेखरशी ओळख करून दिली होती. (Jacqueline Fernandez)

सुकेश जॅकलीनच्या मागे इतका वेडा होता की लाखो रुपयांचे महागड्या ड्रेसचा खर्चदेखील तो उचलायचा. चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने १४ सप्टेंबर रोजी चौकशी केली होती. ८ तासांत झालेल्या चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. सुकेशची एजंट पिंकी इराणीचीदेखील चौकशी करण्यात आली. पिंकीच्या माध्यमातूनच सुकेशने जॅकलिनला अनेक महागडे गिफ्ट्स दिल्याचे समोर आले.

सुकेशने जॅकलीनला आलिशान गाड्या, घड्याळे, कपडे, दागिने आणि एक महागडा बंगलाही भेट दिल्याची माहिती आहे. सुकेश चंद्रशेखर सध्या तिहार तुरुंगात आहे.

 

Back to top button