Vikram Vedha : विक्रम वेधामधील 'अल्कोहोलिया' गाणं रिलीज | पुढारी

Vikram Vedha : विक्रम वेधामधील 'अल्कोहोलिया' गाणं रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) या चित्रपटाने एक अनोखा विक्रम केला आहे. प्रथमच राष्ट्रीय पातळीवरील इव्हेंटद्वारे एखाद्या चित्रपटातील गाणं रिलीज करण्यात आले आहे. हृतिक रोशन आणि सैफ अली खान अभिनीत ‘विक्रम वेधा’ या चित्रपटातील ‘अल्कोहोलिया’ हे पहिलं गाणं लाईव्ह इव्हेंट प्रसारणाद्वारे १५ शहरांमध्ये प्रक्षेपित करण्यात आले. (Vikram Vedha)

‘विक्रम वेधा’च्या टिमने लखनौ, पाटणा, इंदोर, सुरत, नागपूर, जालंधर, चंदीगड, जोधपूर, नोएडा, नाशिक, वाराणसी, रांची, औरंगाबाद, मुंबई आणि दिल्ली अशा एकूण १५ शहरांमध्ये हे गाणं थेट प्रक्षेपित केलं आहे. ‘अल्कोहोलिया’ या गाण्याच्या लाँचप्रसंगी हृतिकनं या गाण्याच्या तालावर आपल्या चाहत्यांसोबत ठेका धरत डान्स केला. चाहत्यांनी त्यांचा आयडल असलेल्या लाडक्या स्टारसोबत डान्स फ्लोअर शेअर करण्याचा मनमुराद आनंद लुटला.

या गाण्यात हृतिक रोशन यापूर्वी कधीही न दिसलेल्या रूपात दिसला आहे. देशी ठेका असलेल्या गाण्यावर हृतिक नाचताना दिसला आहे. काहीसं वेगळ्या शैलीत चित्रीत करण्यात आलेल्या ‘अल्कोहोलिया’ या गाण्यात वेधा आणि त्याची टोळी उत्सव साजरा करताना दिसून आली.

करिअरमधील २५वा चित्रपट असलेला ‘विक्रम वेधा’ माईलस्टोन ठरणारा असल्याचं सांगत हृतिक म्हणाला की, या चित्रपटाला आणि यातील गाण्याला इतक्या सुरेखरीत्या पाठिंबा दर्शवत भरभरून प्रेम दिल्याबद्दल आभारी आहे. विक्रम वेधाच्या संपूर्ण टिमखेरीज हे शक्य नव्हतं. दिग्दर्शकांनी माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल स्वत:ला धन्य मानतो. गणेश हेगडे आणि विशाल-शेखर यांनी बनवलेलं हे गाणं या टीममध्ये नसतं तर ते असं नसतं. या सर्वांसोबत आणि आघाडीच्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाल्यानं मी स्वत:ला भाग्यवान मानतो.

अभिनेत्री राधिका आपटे म्हणाली की, मी हृतिकला फक्त सांगितलं की, मला तिथं बसून खूप हेवा वाटला, पण सिरीयसली, व्वा, काय गाणं आहे?”

‘विक्रम वेधा’मधील गाण्यात वेधा हृतिकच्या भावाची भूमिका साकारणारा रोहित सराफदेखील आहे. डान्स फ्लोअरवर हृतिकसोबत स्क्रीन शेअर करण्याच्या अनुभवाबाबत रोहित म्हणाला की, हा अनुभव केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर कोणत्याही डान्सरसाठी स्वप्नपूर्ती करणारा ठरवा असा होता. मला आजही चांगलं आठवतंय की, मी हृतिक रोशनसोबत एक डान्स करणार आहे. गाण्याची कोरिओग्राफी गणेश हेगडे करणार असल्याचं मी अबुधाबीमध्ये असताना समजलं. सेटवर मी हृतिकबरोबर सहज डान्स करू शकतो असं वाटलं, पण त्याला डान्स करताना पाहून मी हे करू शकत नसल्याची जाणीव झाली. त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्यानं खूप उत्साहित होतो. पुष्कर सर, गायत्री मॅडम, गणेश सर आणि संपूर्ण टिमचे खूप खूप आभार.

गुलशन कुमार, टी-सिरीज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिआ स्टुडिओ आणि वायनॅाट स्टुडिओज प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट प्रस्तुत केला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले आहे. निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे. ३० सप्टेंबर २०२२ रोजी ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट संपूर्ण जगभरात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

Back to top button