अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक जाहीर | पुढारी

अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक जाहीर

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर दीड वर्षाने अखेर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक जाहीर करण्यात आली. महामंडळाच्या घटनेप्रमाणे मीच अध्यक्ष आहे. त्या अधिकाराचा वापर करून निवडणूक कार्यक्रम जाहीर करत असल्याचे मेघराज भोसले यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. दम असेल त्यांनी निवडणुकीत उभे राहून दाखवावे, असे आवाहन भोसले यांनी केले.

यावेळी मेघराज भोसले यांनी आपल्याच पॅनेलमधील पण विरोधात गेलेल्या संचालकांवर टीका केली. महामंडळाची घटना आहे त्याप्रमाणे मी काम करत आहे. महामंडळाच्या नावे बँकांमध्ये लाखो रुपयांची रक्कम आहे. त्यावर काहींचा डोळा होता. त्यामुळे मी महामंडळांची बँक खाती बंद केली; पण कामगार पगार, विज बिलांची देणी भागवली आहेत.

ज्या पद्धतीने मला बाजूला काढून सुशांत शेलार यांना अध्यक्ष करण्यात आले ती पद्धत चुकीची आहे. काळजीवाहू संचालक मंडळ असे बदल करू शकत नाही. त्यांना महामंडळाच्या हिताचे काम करायचे होते, तर मग गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी सभासदांसाठी काय केले? माझ्या कामकाजाबद्दल काही तक्रारी असतील, तर त्यांनी कोर्टात जावे असेही भोसले यांनी सांगितले. कोव्हिड काळात आम्ही निवडणूक घेऊ शकलो नाही; पण नंतर जेव्हा निवडणूक घेण्याची चर्चा केली तेव्हा काही संचालकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे ऑडिटचे काम सुरू आहे. सुशांत शेलार यांनी सही केली आहे. ज्यांना शंका असेल त्यांनी स्वखर्चाने महामंडळाचे रिऑडिट करू शकता, असे सांगिलते.

जयप्रभा स्टुडिओ आंदोलन हे कलाकारांचे आंदोलन दिसायला पाहिजे. पेड आंदोलन नको, असे आरोप भोसले यांनी केले. जयप्रभा स्टुडिओचा प्रश्न जिव्हाळ्याचा प्रश्न आहे; पण काही सदस्यांनी हा वैयक्तिक प्रश्न केला. त्यांनी कोणलाही विश्वासात घेतले नाही. या प्रश्नी आपण दोनवेळा महापालिका आयुक्तांशी चर्चा केली आहे. जयप्रभा स्टुडिओ जागा चित्रीकरणासाठी उपलब्ध झाली पाहिजे, यासाठी प्रयत्नशील राहणार, असे सांगितले.

धनाजी यमकारांचा आरोपबाबत विचारता त्यांच्या आरोपाकडे मी फारसे गांभीर्याने पाहत नाही. माझे काम चांगले म्हणून विक्रम गोखले यांनी माझ्याकडे बघून 5 केाटी रुपयांची जागा दिली. 52 वर्षांत 2 कोटी रक्कम जमा व 5 वर्षांत 12 कोटी रक्कम जमा होणे यातून आमचे काम सभासदांना दिसून येते. विरोधकांनी बॅनरवर जे प्रश्न उपस्थित केले त्याची उत्तरे दिली आहेत. आगामी निवडणुकीत मी पात्र आहे की नाही, हे सभासद ठरवतील. या निवडणुकीत सर्व 17 उमेद्वार निवडून आणू. ज्यांच्यात दम असेल त्यांनी निवडणूक लढवावी, असे आवाहन केले.

दरम्यान, भोसले यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. प्रशांत पाटील यांची निवड केली. अन्य सदस्यांमध्ये अ‍ॅड. प्रताप परदेशी, आकाराम पाटील, शहाजीराव पाटील, सुनील मांजरेकर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

निवडणूक कार्यक्रम अमान्य : शेलार

निवडणुकीचा हा कार्यक्रम मान्य नसल्याचे महामंडळाचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी सांगितले. हा कार्यक्रम बोगस आहे. भोसले अध्यक्ष नाहीत. त्यांना निवडणूक जाहीर करता येत नाही. निवडणूक जाहीर करण्यापूर्वी सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करावा लागतो. ही कोणतीही प्रक्रिया पार न पाडता थेट निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे चुकीचे असल्याचे शेलार यांनी सांगितले.

निवडणूक कार्यक्रम-

दि. 27 सप्टेंबर : सभासदांची कच्ची मतदार यादी तयार करणे
दि. 12 ऑक्टोबर : पक्की मतदार यादी प्रसिद्ध
दि. 13 ते 15 ऑक्टोबर : उमेदवारी अर्ज वाटप
दि. 17 ते 19 ऑक्टोबर : उमेदवारी अर्ज स्वीकारणे
दि. 29 ऑक्टोबर : पात्र उमेदवार यादी जाहीर
दि. 20 नोव्हेंबर : मतदान
दि. 22 नोव्हेंबर : निकाल

Back to top button