

वाई; धनंजय घोडके : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एम.टी.डी.सी.) माध्यमातून मांढरदेव येथे मांढरदेवीच्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातून येणार्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी यात्रीनिवास बांधण्याची सुरुवात 2005 साली करण्यात आली. मात्र अद्यापही हे काम रखडलेलेच आहे. शेकडो भाविकांचा जीव जावूनही भाविकांना अद्याप सुविधा न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
मांढरदेव गडावर 2005 सालच्या झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाकडून न्या. राजन कोचर आयोगाची स्थापना करून मांढरदेव मंदिराच्या परिसरात भाविकांसाठी अनेक सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरले. त्यासाठी अनेक शिफारसींना मान्यता देत 90 लाख रुपयांचा निधी त्यावेळचे पर्यटन मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मंजूर केला. मांढरदेव परिसरात विकासाच्या कामांचा शुभारंभही करण्यात आला होता. शासन खर्या अर्थाने मांढरदेव येथे अनेक बदल करून मांढरदेव हे एक चांगले पर्यटनस्थळ होवू शकते यादृष्टीने विकास करू शकत होते. परंतु मांढरदेवचा विकास कागदावरच राहिला. भाविकांसाठी येण्या-जाण्याच्या मार्गात बदल करून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली.
आजमितीला यात्रीनिवासात अनेक कामे अपूर्ण असून इमारतीला तडे गेले आहेत. पत्रे निखळून पडले आहेत. गटाराची व शौचालयाची दूरवस्था झाली आहे. 121 दुकान गाळे चालू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आतील बाजूचे फरशीचे ब्लॉक उखडून निघाले असून त्याची दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा शासनाला लाखो रुपये खर्च करावा लागणार आहे. इमारतीत लाईट कनेक्शन दिले नसल्याने ही इमारत मद्यपींचा अड्डा बनली आहे. या वास्तूतील अनेक गोष्टी चोरीला गेल्या आहेत. मद्यपींच्या वावरामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा अनेक तक्रारी देवस्थान ट्रस्टकडे स्थानिकांमधून करण्यात येत आहेत.