‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ लवकरच भेटीला | पुढारी

'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' लवकरच भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनी लवकरच घेऊन येत आहे. या मालिकेचे विशेष म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरली ही अशी पहिलीच मालिका आहे ज्या मालिकेचं चित्रीकरण कोकणात सुरू आहे. कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात चित्रित होणारी ही नवी मालिका पाहणं प्रेक्षकांनाही विशेष भावेल. कोकणातली नयनरम्य दृश्यं, हिरवीगार वनराई, निळाशार समुद्र अशा स्वर्गसुखाच्या सान्निध्यात ही नवी मालिका पाहायला मिळणार आहे, याहून दुसरं नेत्रसुख काय असू शकतं. या मालिकेचं चित्रीकरण कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील्या देवगड या गावात सुरू आहे. ‘शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास, बयोच्या प्रयत्नांना शिक्षणाची आस’ असं ब्रीदवाक्य असलेल्या या मालिकेत निसर्गाच्या सान्निध्यात राहणारी ही छोटी बयो तिच्या डॉक्टर होण्याच्या मोठ्या स्वप्नाला कसा आकार देणार, हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल.

या मालिकेत छोट्या बयोची भूमिका बालकलाकार रुची नेरुरकर हिने साकारली आहे. मूळची कोकणातली असलेली रुचीचं मालिका विश्वातलं हे पदार्पण आहे. तर विक्रम गायकवाड, वीणा जामकर, नम्रता पावस्कर, शरद सावंत हे कलाकारही मालिकेत पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री वीणा जामकर पहिल्यांदाच मालिकाविश्वात पाहायला मिळणार आहे.

मालिकेतील काही निवडक कलाकारही कोकणातील असल्याने कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात चित्रीकरण करण्याची मज्जा काही औरच आहे. अशा या कोकणपुत्रांचा अभिनय छोट्या पडद्यावर पाहणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल यात शंकाच नाही. तर ‘इवल्या डोळ्यांना मोठ्या स्वप्नांची ओढ, बयोच्या ध्यासाला पुस्तकाची ओढ’ असं म्हणत पुस्तकात सतत डोकं घालून असणार्‍या बयोचा डॉक्टर होण्याचा प्रवास कसा पूर्ण होईल हे पाहणं रंजक ठरेल.

Back to top button