सातारा : जिलेटीनचा स्फोट करून एटीएम फोडले; परिसर हादरला, नागरिकांत घबराट | पुढारी

सातारा : जिलेटीनचा स्फोट करून एटीएम फोडले; परिसर हादरला, नागरिकांत घबराट

सातारा; पुढारी वृत्तसेवा नागठाणे ( ता. सातारा) येथील एटीएम मशीन जिलेटीनच्या साहाय्याने फोडून अज्ञातांनी त्यातील रक्कम चोरून नेली. ही घटना मध्यरात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली असून, या घटनेने परिसर हादरून गेला आहे. दरम्यान, बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, नागठाणे हे पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरचे गाव आहे. काल (मंगळवार) रात्री बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मशीन चोरट्यांनी तयारीनिशी फोडले. यासाठी जिलेटीन सारख्या स्फोटकाचा वापर केल्‍याचे समोर आले आहे. स्फोटकाचा आवाज झाल्याने परिसर हादरून गेला. यावेळी चोरट्यांच्या हाती रक्कम लागल्याचे समोर येत आहे. मात्र नेमकी किती रक्कम गेली, हे अद्याप समोर आलेले नाही.

बोरगाव पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी, श्वान पथक, ठसे तज्ञ यांनी मध्यरात्री घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, गेल्या दोन महिन्यापूर्वी कराड येथे जिलेटीन स्फोटकाचा वापर करून एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र स्फोट झाला नाही व चोरीचा प्रयत्न नागरिक, पोलिसांमुळे उघडा पडला. जिलेटीनचा पोलिसांनी स्फोट करून ती जागा सुरक्षित केली  होती. मात्र पुन्हा असा प्रकार झाल्‍याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा :  

 

Back to top button