हिंगोली : तुळजापूरवाडीत जुगार अड्डयावर छापा; परभणीच्या २४ जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

हिंगोली : तुळजापूरवाडीत जुगार अड्डयावर छापा; परभणीच्या २४ जणांवर गुन्हा दाखल

हिंगोली पुढारी वृत्तसेवा : हिंगोली व परभणी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तुळजापूरवाडी शिवारात पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात 4.11 लाख रुपये रोख, 10 दुचाकी तर 2 चारचाकी वाहने असा सुमारे 20.34 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी 24 जणांवर हट्टा पोलिस ठाण्यात बुधवारी पहाटे गुन्हा दाखल केला. यातील बहुतांश जुगारी परभणी जिल्ह्यातील आहेत.

तुळजापूरवाडी शिवारातील एका आखाड्यावर परभणीच्या जुगाऱ्यांनी अंदर बाहरचा डाव मांडला होता. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी कुटुंर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दिनेश येवले यांचे पथक स्थापन करून जुगार अड्डा उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिले. उपनिरीक्षक येवले यांच्या पथकाने मंगळवारी रात्री तुळजापूरवाडी शिवारातील या आखाड्यावर छापा टाकला. यामध्ये 24 जण अंदर बाहर नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून 4.11 लाख रुपये रोख, 10 दुचाकी, 2 स्वीफ्ट कार असा 20.34 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

या प्रकरणी उपनिरीक्षक येवले यांच्या तक्रारीवरून बिटीसिंग बावरी, लक्ष्मण गडप्पा, संजय टेकोले, सागर मुंठे, संजय थोरात, व्यंकटेश वानखेडे, गंगाधर पातींकोंडा, विनय लहाने, वैभव झोडपे, सिध्दांत एंगडे, संजय घाडगे (सर्व रा. परभणी), गंगाधर दुधारे (रा. फुकटगाव, ता. पुर्णा), गणेश कदम, माणिक कदम (पुर्णा), विरासिंग दुधाणे (झरी), काशीनाथ चव्हाण, गजानन चव्हाण (आडगाव), विशाल भिमरवार, पंकज पांढरे (वसमत), श्रीकांत खाडे (हट्टा), दिगंबर जाधव (कुरझाळ, ता. औंढा), दामोदर सावंत (बळेगाव), गंगाधर मानवतकर (जवळाबाजार) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन सरोदे, उपनिरीक्षक पठाण पुढील तपास करीत आहेत. हिंगोली व परभणी सीमेचा गैरफायदा घेऊन शेतातील आखाड्यावर बस्तान मांडणाऱ्या परभणीच्या जुगाऱ्यांकडून हिंगोली पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा

Back to top button