दिव्या कुमारचे “नाद नाद गणपती” मराठी म्युझिक अल्बममधून पदार्पण

दिव्या कुमार
दिव्या कुमार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'चोरीचा मामला', 'भेटली ती पुन्हा' तसेच आगामी 'लव सुलभ" अशा उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर स्वरूप स्टुडिओज् आता नवा अल्बम घेऊन येत आहे. स्वरूप म्युझिक या नव्याकोऱ्या युट्युब म्युझिक चॅनलद्वारे म्युझिक अल्बम क्षेत्रात पदार्पण करत आहेत. गणेशोत्सवाचे औचित्य साधत "नाद नाद गणपती…." या गाण्यानं म्युझिक चॅनलचा प्रारंभ होत आहे. 'जी करदा'सारखी अनेक हिट गाणी गायलेला गायक दिव्या कुमारने हे गाणं गायलं आहे.

स्वरूप म्युझिकच्या प्रभाकर परब, सचिन नारकर, विकास पवार यांनी "नाद नाद गणपती…" या गाण्याची निर्मिती केली आहे. विष्णु सकपाळ यांनी लिहिलेलं हे गाणं वरद-राजू या संगीतकार जोडीनं संगीतबद्ध केलं आहे. गाण्याचं संगीत संयोजन आणि प्रोग्रामिंग मॉन्टू गोसावी, राजू कुलकर्णी, वरद कुलकर्णी यांनी केले आहे. संगीत संयोजक रूपम भागवत आहेत.

दिव्या कुमार हे चित्रपट संगीतातलं मोठं नाव आहे. हिंदी मराठी चित्रपटांसह त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही अनेक हिट गाणी गायली आहेत. तर स्वरूप स्टुडिओजनं आतापर्यंत उत्तम चित्रपट निर्मिती केली आहे. त्यामुळे स्वरूप स्टुडिओजनं आता नव्या दमाच्या कलाकारांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी "स्वरूप म्युझिक" हा स्वतंत्र चॅनल सुरू केला आहे. "नाद नाद गणपती हा दमदार म्युझिक व्हिडिओच्या रुपानं २४ ऑगस्टला प्रेक्षकांसमोर येत आहे.

दिव्या कुमार यांनी काही मराठी चित्रपटांसाठी गाणी गायली असली, तरी "नाद नाद गणपती…" हा त्यांचा पहिलाच मराठी म्युझिक अल्बम आहे. त्यामुळे त्यांच्या जादुई आवाजासह उत्तम शब्द आणि संगीत असलेला हा म्युझिक व्हिडिओ यंदाच्या गणेशोत्सवाचं आकर्षण ठरेल हे नक्की.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news