‘पोलिस’, ‘उत्पादन शुल्क’ झाले अ‍ॅक्टिव्ह; मावळ तालुक्यात दिवसभरात 10 ते 15 दारू अड्ड्यांवर छापा

‘पोलिस’, ‘उत्पादन शुल्क’ झाले अ‍ॅक्टिव्ह; मावळ तालुक्यात दिवसभरात 10 ते 15 दारू अड्ड्यांवर छापा

Published on

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यांबाबत अधिवेशनात आवाज उठवून कामशेत पोलिस ठाण्यावर बेधडक मोर्चा काढणार्‍या आमदार सुनील शेळके यांच्या आक्रमक भूमिकेनंतर खडबडून जागे झालेल्या पोलिस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाने आज तब्बल 10 ते 15 दारू अड्ड्यांवर छापा टाकून कारवाई केली. मावळ तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्यासारख्या घटनांचे मूळ कारण गावोगावी सुरू असलेले अवैध दारू धंदे असून हे दारू धंदे पहिले बंद करा अशी मागणी अधिवेशनात करून याच मागणीसाठी आमदार शेळके यांनी मावळ तालुका राष्ट्रवादीच्या वतीने कामशेत पोलिस ठाण्यावर बेधडक मोर्चा काढला.

यावेळी थेट कामशेत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावात सुरू असलेल्या दारू अड्ड्यांवरील दारुचे कॅन आणून आक्रमक भूमिका घेत या अवैध धंद्यांना पाठीशी घालणार्‍या पोलीस अधिकार्‍यांची तात्काळ बदली करा अन्यथा दारुचे कॅन अधिवेशनात नेण्याचा इशारा आमदार शेळके यांनी दिला. यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलिस व उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने सोमवारी (दि.22) तालुक्यात विविध ठिकाणी छापा टाकून दारू अड्ड्यांवर कारवाई केली.

यामध्ये कामशेत पोलिसांनी पाथरगाव, नाणे, कोथुर्णे, कडधे येथील अवैध दारू अड्ड्यांवर छापा टाकून 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  लोणावळा ग्रामीण पोलिसांनी वाकसई, करंडोली व वरसोली येथील दारू अड्ड्यांवर कारवाई केली. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने देखील मावळात 6 पथके तैनात करून डोंगरगाव, वाकसई, टाकवे येथील दारू अड्ड्यांवर छापा मारून 3 जणांना अटक केली आहे.

'पुढारी' च्या वृत्ताला मिळाला दुजोरा !
मावळात राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध दारू विक्री सुरू असल्याबाबत 'पुढारी'ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले होते. आमदार शेळके यांनी अधिवेशनात याबाबत मुद्दा उपस्थित केल्यानंतरही 'पुढारी' ने दि.20 रोजी 'मावळात अवैध दारू विक्री जोमात अन उत्पादन शुल्क विभाग कोमात' हे वृत्त प्रसिद्ध करून पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादानेच हे धंदे सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. दरम्यान आमदार शेळके यांनी दि.21 रोजी कामशेत पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला आणि पोलिसांपाठोपाठ उत्पादन शुल्क विभागानेही करवाई सुरू केल्याने 'पुढारी'च्या वृत्ताला दुजोरा मिळाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news