Pradeep Patwardhan : ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड | पुढारी

Pradeep Patwardhan : ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांची मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख होती.

गिरगावात राहणाऱ्या प्रदीप पटवर्धनांनी महाविद्यालयीन काळापासूनच एकांकिका स्पर्धांमध्ये केले होते. चतुरस्त्र अभिनेता अशी ओळख कमावलेले पटवर्धन त्यानंतर व्यावसायिक नाटकाकडे वळले. मराठी सिनेमामध्येही त्यांनी केलेल्या अनेक भूमिका गाजल्या. त्यांचे अनेक चित्रपट आणि मालिका आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. मराठी रंगभूमीवर अनेक दशके हाऊस फूल्लचा बोर्ड मिरवणाऱ्या ‘मोरुची मावशी’ या नाटकातली पटवर्धन यांची भूमिकाही खूप गाजली होती. या नाटकाचे तब्बल दीड हजारांहून अधिक प्रयोग त्यांनी केले.

याशिवाय त्यांनी नवरा माझा नवसाचा, चश्मे बहाद्दर, एक दोन तीन चार, लावू का लाथ, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं, एक शोध अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये पटवर्धन यांनी आपला ठसा उमटवला. त्यासोबतच होल्डिंग बॅक (२०१५), मेनका उर्वशी (२०१९), थँक यू विठ्ठला (२००७), १२३४(२०१६) आणि पोलीस लाईन एक पूर्ण सत्य (२०१६) यासारख्या चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली होती.

मुंबईत राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. ‘मोरूची मावशी’ या नाटकातील त्यांचा अभिनय वाखाणण्याजोगे होता. दिग्गज अभिनेते भरत जाधव, विजय चव्हाण, विजय पाटकर यांसारख्या कलाकारांसोबत त्यांनी काम केलं होतं. लावू का लाथ यासारख्या चित्रपटातही ते दिसले होते. रंगभूमीवर आपली वेगली छाप सोडणारा अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अनेक नाटके, जाहिराती आणि चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटातील त्यांचे बाबू कालिया हे पात्र सर्वांच्याच लक्षात राहिल असे होते. सुप्रिया आणि सचिन पिळगावकर तसेच अशोक सराफ यासारख्या बड्या कलाकारांसोबत त्यांनी काम केलं होतं.

प्रदीप पटवर्धन यांच्या निधनामुळे शोक व्यक्त करण्यात येत असून मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Back to top button