सांगली : सर्व वीज ग्राहकांवर 20 टक्के वाढ | पुढारी

सांगली : सर्व वीज ग्राहकांवर 20 टक्के वाढ

सांगली; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील घरगुती, व्यापारी, शेतकरी, औद्योगिक व अन्य सर्व 2.87 कोटी ग्राहकांवर जुलै 2022 मध्ये मिळालेल्या बिलापासून पाच महिन्यांसाठी अदानी (इंधन) समायोजन आकार या नावाखाली थेट वीज आकाराच्या 20 टक्के दरवाढ लागू केली आहे. याशिवाय थकीत इंधन समायोजन आकार 1226 कोटी रुपये, अदानीचे राहिलेले देणे 7709 कोटी व समान करार असलेल्या रतन इंडियाचे देणे हा बोजा डिसेबर 2022 पासून लागू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना अध्यक्ष व वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे.

ते पुढे म्हणाले, याशिवाय महावितरण कंपनी सप्टेंबर 2022 नंतर मध्यावधी फेरआढावा याचिका दाखल करणार, हे निश्चित आहे. या याचिकेद्वारे दोन वर्षांचा कोरोना काळातील घाटा व खर्चातील वाढ या नावाखाली पुन्हा 20 हजार कोटी रूपये व अधिक वाढ मागणीची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी आजच जागरूकतेने या दरवाढीस विरोध करणे व शासनाने हस्तक्षेप करावा यासाठी चळवळ व आंदोलन करणे आवश्यक आहे.

यासाठी राज्यस्तरीय समन्वय समितीने दि. 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या आठवड्यात राज्यात सर्वत्र जिल्हा, विभाग व तालुकास्तरावर आंदोलन जाहीर केले आहे. कोणत्याही वर्गातील ग्राहकांना ही दरवाढ न परवडणारी व न झेपणारी आहे.

हेही वाचा

Back to top button