Anupam Kher : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने केली ५२६ व्या चित्रपटाची घोषणा | पुढारी

Anupam Kher : 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने केली ५२६ व्या चित्रपटाची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचे प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांनी भारतीय चित्रपटात आपल्या ३८ वर्षांच्या दीर्घ कारकीर्दीत अनेक ताकदीचे चित्रपट केले आहेत. ‘अ वेन्सडे’ ते ‘स्पेशल 26’ सारख्या अनेक कल्ट चित्रपटांचीही नावं इथे घेता येतील. तब्बल ५२५ चित्रपटांमध्ये काम केल्यावर खेर यांनी आता आगामी ‘कागज २’ ची घोषणा केली आहे. जुने दोस्त आणि अभिनेते सतीश कौशिक यांच्यासह ते या चित्रपटात दिसणार आहेत. नाटकांमधून आपली सुरुवात करत चित्रपटांमध्ये आपली प्रतिमा उमटवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कमालीचा खास आहे.

‘कागज २’ हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कागज’ या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट एका सामान्य माणसाच्या संघर्षावर प्रकाश टाकत होता. माणसाला शासनाने जिवंत असतानाच चुकून मृत घोषित केलेले असते.

कू अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करत अनुपम खेर यांनी लिहिले, “मित्रांनो, या २८ वर्षांमध्ये ५२६ चित्रपट! केवळ तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद यांमुळेच हे शक्य झाले आहे. आज मी जो काही आहे, तो तुमचे प्रेम, प्रार्थना आणि प्रेमामुळेच आहे.” व्हिडिओच्या शेवटी अनुपम म्हणतात, “चला, आयुष्याचा उत्सव साजरा करू या, सिनेमाचा उत्सव साजरा करू या.” अनुपम खेर यांच्यासह या चित्रपटात पंकज त्रिपाठी, मोनल गज्जर, सतीश कौशिक आणि अमर उपाध्याय यांच्याही खास भूमिका आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शक व्हीके प्रकाश आहेत.

अनुपम खेर आणि सतीश कौशिक हे १९७५ मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये एकत्र होते. तेव्हापासूनच त्यांच्यात मैत्री आहे. दोघांनी शेवटचे एकत्र काम “द कश्मीर फाईल्स” मध्ये केले होते. काही काळापूर्वीच प्रदर्शित झालेला हा चित्रपट विवेक अग्निहोत्रीने दिग्दर्शित केला होता.

Back to top button