‘सागरा’चे पाणी अखेर घरात घुसलेच! | पुढारी

‘सागरा’चे पाणी अखेर घरात घुसलेच!

मुंबई : दिलीप सपाटे :  मेरा पानी उतरा देख,
किनारे पर घर मत बसा लेना
मैं समुंदर हू…
लौट के वापस आऊंगा

असा गर्भित इशारा देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मध्ये मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होतानाच शिवसेनेला दिला होता. त्यानुसार गेली दोन-अडीच वर्षं फडणवीस नावाच्या या समुद्राने आपल्या ‘सागर’ बंगल्यावरून राजकीय डावपेच टाकत असे काही वादळ निर्माण केले की, या वादळात उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद तर बुडालेच; पण शिवसेनेची मजबूत तटबंदीही भेदली गेली. या वादळाच्या तडाख्यातून सावरणे हे आता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपुढचे मोठे आव्हान आहे.

2019 ची विधानसभा निवडणूक शिवसेना – भाजपने एकत्र लढविली होती. पण सत्तेत एकत्र असलो तरी भाजप आपल्याला संपवत असल्याची भावना निर्माण झालेल्या उद्धव ठाकरे यांनी निवडणूक निकालात आकड्यांनी संधी देताच फडणवीस यांना धक्‍का देत मुख्यमंत्रिपद गाठले. रिमोट कंट्रोल हाती ठेवणार्‍या ठाकरे घरण्यातील कोणीतरी पहिल्यांदा सत्तेचा राजमुकुट चढला होता. पण उद्धव ठाकरे यांच्यासाठीही हा मुकुट काटेरीच ठरला.

106 आमदार निवडून आणूनही दुसर्‍यांदा हाताशी आलेले मुख्यमंत्रिपद उद्धव ठाकरे यांनी काढून घेतल्याचा घाव जिव्हारी लागलेले फडणवीस दुसर्‍या दिवसापासून सत्तांतर घडवून आणण्यासाठी कामाला लागले होते. त्याची जाणीवही उद्धव ठाकरे यांना झाली होती. मात्र हे सत्तांतर मुख्यमंत्रिपदाची खुर्चीच नाही तर आपल्या पक्षाची शकले उडविणारे ठरेल, अशी कल्पना उद्धव ठाकरे यांनी अजिबात केली नव्हती. त्यामुळे ठाकरेंचा प्रत्यक्ष सत्ताकारणाचा पहिला प्रयोग तरी फसला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाबरोबरच विधान परिषदेचे सदस्यत्व सोडून विधिमंडळाकडून पुन्हा शिवसेना भवनाची वाट धरली आहे.

सत्ताकाळात पक्ष आणि सत्ता चालविणे यातील फरक ते समजू शकले नाहीत, अशी आता चर्चा आहे. सत्ता राबवावी लागते हे त्यांना उमगले नाही. सत्ता राबविण्यासाठी आधी स्वतःला राबावे लागते. त्यातच उद्धव ठाकरे कमी पडले. त्यांनी मंत्रालयात येण्यापेक्षा ‘वर्षा’वर बसून ऑनलाईन कारभारावर भर दिला. कोरोना काळात ते खपून गेले. पण निर्बंध उठल्यानंतर मात्र त्यांच्या कार्यपद्धतीची चर्चा खुलेआम सुरू झाली. ते बोलतात चांगले, प्रामाणिकही आहेत आणि चांगले व्यक्‍ती आहेत.

मात्र एका प्रशासकाला आवश्यक असलेले प्रशासकीय कौशल्य आणि जरब त्यांच्यात नाही, हे त्यांचे सहकारी मंत्री आणि त्यांचे आमदारही बोलू लागले होते. यापूर्वी कोणत्याही पक्षाच्या आमदाराला मुख्यमंत्री कार्यालयाचे दार कायम उघडे असायचे. आमदार थेट मुख्यमंत्र्यांकडे जाऊन कामे करून घेऊ शकत होते. पण, उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात ‘वर्षा’ आणि ‘सह्याद्री’ची देखील हळूहळू ‘मातोश्री’ होऊ लागली. ते आपल्या अवतीभोवतीच्या गराड्यातच रमून गेले. त्यात आपल्या पायाखाली काय जळतंय आणि पाठीमागे काय शिजतंय, याचा त्यांना उशिराने थांगपत्ता लागला. तोपर्यंत उशीर झाला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी दहाच्या ठोक्याला मंत्रालयात येऊन त्यांच्या आमदारांची आणि पक्षातील लोकांची कामे करत असताना आपले मुख्यमंत्री भेटतच नाहीत, भेटले तर कामे समजून घेत नाहीत, ही नाराजी पक्षातील आमदारांमध्ये वाढली. त्यातच शिवसेना आमदार आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मतदारसंघ समान असल्याने शिवसेनेच्या आमदारांना आणि इच्छुकांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंताही सतावत होती. त्यातूनच कोल्हापूरच्या राजेश क्षीरसागर यांची पोटनिवडणुकीत नाराजी समोर आली, तर नांदेडच्या देगलूर-बिलोलीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे तेथील माजी आमदार सुभाष साबणे यांनी बंडखोरी करून भाजपकडून निवडणूक लढविली.

तेव्हा साबणे यांना एकनाथ शिंदे यांची छुपी मदत झालीच होती. परंतु, सेनेतील ही नाराजी ओळखून फडणवीस यांनी आपले फासे टाकले. नाराजीला खतपाणी घातले. हे फासे टाकताना एकनाथ शिंदे हेच त्यांचे म्होरके होते. मधल्या काळात एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांची त्यांच्या मतदारसंघातील कामे करतानाच वैयक्‍तिक पातळीवरही त्यांना रसद पुरविली. जोडीला ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या कारवाईमुळे हैराण झालेल्या शिवसेना आमदारांना असलेली कारवाईची भीतीही त्यांना भाजपच्या जवळ घेऊन गेली आणि शिवसेनेच्या इतिहासातील पहिले बंड यशस्वी ठरले.

आता या धक्क्यातून पक्षाला सावरण्याचे आणि पुन्हा नव्या जोमाने उभे करण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यापुढे आहे. त्यांनी सत्ता सोडताना ही उमेद शिवसैनिकांत जागविण्याचा निश्‍चित प्रयत्न केला आहे. नेते गेले तरी सामान्य शिवसैनिक त्यांच्या सोबत उभा आहे, ही त्यांना दिलासा देणारी बाब आहे. त्यामुळेच त्यांनी या सामान्य शिवसैनिकांच्या जोरावर नव्या जोमाने पक्ष उभा करण्याचा निर्धार व्यक्‍त केला आहे.

त्यांची पहिली अग्‍निपरीक्षा ही येऊ घातलेल्या मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद, नाशिक आदी महापालिकांच्या निवडणुकीत होणार आहे. विशेषतः मुंबई, ठाण्याच्या बालेकिल्ल्यात सत्ता राखण्याचे कठीण आव्हान त्यांच्यापुढे उभे राहिले आहे. कारण सत्ता हाती आल्याने आत्मविश्‍वास दुणावलेले देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे हे बालेकिल्ले ताब्यात घेण्यासाठी सर्व ताकदीनिशी हल्ले करतील यात शंका नाही.

Back to top button