मुख्यमंत्री सातारचे याचा अभिमान; विकासासाठी साथ देऊ | पुढारी

मुख्यमंत्री सातारचे याचा अभिमान; विकासासाठी साथ देऊ

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याचा आम्हाला अभिमान असून जिल्ह्याच्या विकासाचा गाडा आता आणखी गतिमान होणार आहे. त्यांना मिळालेले मुख्यमंत्रीपद हा सातारा जिल्ह्याचा गौरव आहे. विकासाच्या प्रक्रियेत त्यांना साथ देवू, अशा भावना सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय मातब्बर नेतेमंडळींनी व्यक्‍त केल्या आहेत.

विधान परिषद सभापती ना.रामराजे ना.निंबाळकर : सातारा जिल्ह्याचे भूमिपूत्र असलेल्या एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्‍ती झाल्याचा विशेष आनंद आहे. स्व. यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर चौथ्यांदा एकनाथ शिंदे यांच्या रुपाने सातारा जिल्ह्याला मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. एकनाथ शिंदे व माझे व्यक्‍तीश: स्नेहाचे संबंध राहिले आहेत. सातारा जिल्ह्याच्या समतोल व चौफेर विकासासाठी त्यांनी योगदान द्यावे, आमची त्यांना साथ असेल.

खा. श्रीनिवास पाटील : ना. एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. जुना संयुक्त सातारा म्हणजेच आजच्या सातारा व सांगलीच्या मूळ भूमिपुत्रांनी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळण्याची परंपरा खूप मोठी आहे. कराडचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, पद्माळ्याचे स्वर्गीय वसंतदादा, नांदवळचे शरदचंद्र पवार, कलेढोणचे बॅरिस्टर बाबासाहेब भोसले, कुंभारगावचे पृथ्वीराजबाबा चव्हाण आणि आता दरे गावचे एकनाथराव शिंदे. याचा सर्व सातारकरांना सार्थ अभिमान आहे. सातारा जिल्ह्याच्या उज्ज्वल परंपरेची जपणूक व महाराष्ट्र राज्याच्या तमाम जनतेची उत्तम सेवा त्यांच्या हातून घडो ही सदिच्छा. त्यांना मनपूर्वक शुभेछा!
आ. पृथ्वीराज चव्हाण :महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आज एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. यापुर्वी सातारा जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले व मी स्वतः मुख्यमंत्री पद भूषवले असून राज्याच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर जिल्ह्याला एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मुख्यमंत्रीपद मिळाले, याचा जिल्ह्याचा सुपुत्र या नात्याने मला मनस्वी आनंद आहे. एकनाथ शिंदे यांच्या हातून राज्याचा धोरनात्मक विकास होईल.
आ. शंभूराज देसाई : ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारासाठी आम्ही 50 आमदारांनी जी भुमिका घेतली आणि आमचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी करावं, असा आग्रह आम्ही सर्व आमदारांनी धरला. आम्हाला या गोष्टीचे समाधान आहे की आम्ही जी भुमिका घेतली त्याला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने आणि राज्याच्या नेतृत्वाने पाठिंबा दिला. आमच्याकडे 50-52 आमदार असताना आणि भाजपकडे 110 आमदारांचे पाठबळ असताना एवढ्या मोठ्या गटाने शिंदे यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री पदासाठी केली याचा आम्हा सर्वांना आनंद आहे.
आ. शिवेंद्रराजे भोसले : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्याने विकासाची कामे गतीने होतील. एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असल्याने व जावलीच्या मातीशी त्यांचा संबंध असल्याने विकासाच्या प्रक्रियेत त्यांची मोलाची साथ राहिल. देवेंद्र फडणवीस यांच्या त्याग व सहकार्यामुळे सातारा जिल्ह्याचा भुमीपुत्र मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसला याचा आम्हा सातारा जिल्हावासियांना अभिमान आहे.
आ. मकरंद पाटील : सातारा जिल्ह्याचे भूमीपूत्र असलेले एकनाथ शिंदे हे माझ्या मतदारसंघातील आहेत, याचा मला अभिमान आहे. नगरविकासमंत्री म्हणून महाबळेश्‍वर तालुक्यासाठी त्यांनी मला सहकार्य केले आहे. आता कोयनेचा हा भूमीपूत्र महाराष्ट्राचा मूख्यमंत्री होत असल्याबद्दल आम्हाला सर्वांनाच आनंद आहे.सातारा जिल्ह्याच्या विकासात त्यांनी योगदान द्यावे.
आ. दिपक चव्हाण : सातार्‍याचे सुपूत्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याने आनंद आहे. राज्यासह सातारा जिल्ह्याचा त्यांच्या माध्यमातून विकास होण्यास मदत होईल.
आ. शशिकांत शिंदे : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. ते जावलीचे सुपूत्र असल्याने त्यांचा अभिमान असून आमचे आपुलकीचे संबंध आहेत. आपल्या माणसाला राज्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. त्याचे नक्कीच ते सोने करतील. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा जिल्ह्याच्या विकासासाठी फायदा होईल.
माजी आमदार मदन भोसले : एका सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील असलेले एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पाहताना आनंद होत आहे. भाजपा व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेले औदार्य व घेतलेल्या निर्णयाला माझा सलाम आहे.
माजी आ. सदाशिव सपकाळ :
आम्ही शिवसेनेसोबत आहोत.जावली तालुक्याचा पहिलाच व जिल्ह्याचा चौथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने झाला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.शिवसेनेच्या हिंदुत्ववादी विचाराचा मुख्यमंत्री झाला आहे.
माजी आ. कांताताई नलावडे:
भारतीय जनता पार्टीच्या चाणक्याने एक नवल करून दाखवले आहे. सातारचा सामान्य कुटुंबातील एक मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आहे. खर्‍या अर्थाने सातारा जिल्ह्याचा विकास करण्याचे ध्येय एकनाथ शिंदे यांचे असणार आहे.
शेखर गोरे :
आम्ही आजही, उद्याही फक्त आणि फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत राहणार आहे.
चंद्रकांत जाधव :
ना. एकनाथ शिंदे हे हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होवून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ख्याती आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीत ते तयार झाले आहेत.त्यामुळे ते निश्‍चितच हिंदुत्वाचा विचार सोडणार नाहीत. हिंदुत्वाचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांनी उचललेले पाऊल अतिशय मुत्सद्दीपणाचे आहे. मुख्यमंत्री झाल्याने जिल्ह्याचा विकास होण्यास मदत होणार आहे.

Back to top button