CIFF2022 ढाकामध्ये ‘मोऱ्या’ची निवड | पुढारी

CIFF2022 ढाकामध्ये 'मोऱ्या'ची निवड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपलं आरोग्य पणाला लावून नरकयातना भोगत गल्ल्या-गटारांची साफसफाई करणाऱ्या सिताराम जेधे उर्फ मोऱ्याची हृदयस्पर्शी कथा’ आगामी “मोऱ्या” या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेता अशी त्रिसूत्री सांभाळण्यात यशस्वी ठरलेल्या जितेंद्र पुंडलिक बर्डे यांची ही पहिलीच कलाकृती ‘ढाका फेस्टिवल’ आयोजित ‘सिनेमेकिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’-(CIFF2022) मध्ये निवडली गेली आहे. या चित्रपटाच्या टीझरचे प्रदर्शन जगप्रसिद्ध ‘कान्स महोत्सवात’ करण्यात आले होते. चित्रपटाचा टिझर पाहून अनेक चित्रपट रसिक – समीक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. (CIFF2022)

आपल्या पहिल्या कलाकृतीला ‘सिनेमेकिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’-(CIFF) मध्ये निवडल्याने हा माझा आणि माझ्या सर्व कलावंतांचा गौरव आहे, असे लेखक – दिग्दर्शक जितेंद्र पुंडलिक बर्डे म्हणाले. “मोऱ्या” चित्रपटाचा विषय आणि सादरीकरणासाठी केलेले सखोल संशोधन, या निवडीने सार्थकी लागल्याचे सिद्ध झाले आहे. जगभरातील तसेच तळागाळातील सर्व सामान्य प्रेक्षकांपर्यंत ही कलाकृती पोहचावी अशी आमच्या सर्व कलावंतांची इच्छा होती आणि ती सुरुवात ‘सिनेमेकिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’-(CIFF) पासून होत असल्याने चित्रपटातून जे दाखवायचे आहे ते नक्की शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत पोहचेल अशी खात्री झाली आहे” असे जितेंद्र बर्डे सांगतात.

या चित्रपटाची निर्मिती’ टॉर्टुगा मोशन पिक्चर्स’, तृप्ती कुलकर्णी, राजेश विश्वनाथ अहिवळे, सहनिर्माता मंदार मांडके यांनी केली असून उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, राहुल रोकडे, सुरज अहिवळे, रुद्रम बर्डे, कुणाल पुणेकर, शिवाजी गायकवाड, दीपक जाधव, विजय चौधरी, अविनाश पोळ, रुपाली गायके आणि जितेंद्र पुंडलिक बर्डे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Back to top button