COVID19 | देशातील कोरोना रुग्णसंख्येत किंचित घट, २४ तासांत १५,९४० नवे रुग्ण, २० मृत्यू | पुढारी

COVID19 | देशातील कोरोना रुग्णसंख्येत किंचित घट, २४ तासांत १५,९४० नवे रुग्ण, २० मृत्यू

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : देशातील कोरोना (COVID19) रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत याआधीच्या दिवसाच्या तुलनेत ८ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १५,९४० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २० जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १२,४२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात ९१,७७९ सक्रिय रुग्ण आहेत. देशातील दैनंदिन कोरोनासंसर्ग दर (Daily positivity rate) ४.३९ टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात गुरूवारी दिवसभरात १७ हजार ३३६ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, १३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, या दिवशी १३ हजार २०९ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.५९ टक्क्यांवर घसरला. तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर ४.३२ टक्के आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर ३.०७ टक्के नोंदवण्यात आला होता.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानाअंतर्गत १९६ कोटी ९४ लाख ४० हजार ९३२ डोस देण्यात आले आहेत. यातील १५ लाख ७३ हजार ३४१ डोस काल एका दिवसात देण्यात आले आहेत. तर, आतापर्यंत १२ ते १४ वयोगटातील बालकांना ३.६१ कोटी पहिले डोस देण्यात आले आहेत. खबरदारी म्हणून आतापर्यंत ४ कोटी ३१ लाख ४१ हजार ४५० बूस्टर डोस देण्यात आले आहेत.

लसीकरणामुळे वाचले कोट्यवधी लोकांचे जीव

कोरोना (COVID19) महारोगराईमुळे जगभरात कोट्यवधी लोकांचा जीव गेला. भारतात देखील ५ लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.अशात कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण अभियान राबवण्यात आले आहे. या लसीकरणामुळेच कोट्यवधी लोकांचे प्राण वाचले आहे. ‘द लान्सेट इंफेक्शियस डिजीज जर्नल’ मध्ये प्रकाशित एका अहवालानूसार भारतात २०२१ मध्ये लसीकरणामुळे ४२ लाख लोकांचे प्राण वाचल्याचा दावा करण्यात आला आहे.

सोबतच जगभरात लसीकरणामुळे दोन कोटी लोकांचे प्राण वाचवण्यात यश आल्याचे देखील अहवालातून सांगण्यात आले आहे.१८५ हून अधिक देशांतील मृत्यूच्या आकडेवारीच्या आधारावर हा अनुमान काढण्यात आला आहे. ही आकडेवारी डिसेंबर २०२० ते डिसेंबर २०२१ पर्यंत घेण्यात आली आहे. अभ्यासानूसार डब्ल्यूएचओ चे लक्ष २०२१ पर्यंत पूर्ण केले असते, तर ५ लाख ९९ हजार ३०० लोकांचे प्राण वाचवले जावू शकले असते. २०२१ च्या अखेरपर्यंत प्रत्येक देशात ४० टक्के लोकसंख्येला किमान दोन अथवा दोन हून अधिक लस लावण्याचे लक्ष डब्ल्यूएचओकडून देण्यात आले होते.

Back to top button