अभिनेत्री शिल्‍पा शेट्‍टी, सुनंदा शेट्‍टींवर कोट्यवधी रुपयांच्‍या फसवणूकीचा आरोप | पुढारी

अभिनेत्री शिल्‍पा शेट्‍टी, सुनंदा शेट्‍टींवर कोट्यवधी रुपयांच्‍या फसवणूकीचा आरोप

लखनौ; पुढारी ऑनलाईन : पती राज कुंद्राच्‍या पॉर्न व्‍हिडिओ रॅकेट प्रकरणी चौकशीच्‍या भोवर्‍यात सापडलेली अभिनेत्री शिल्‍पा शेट्‍टी हिच्‍या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कंपनी स्‍थापन करण्‍याच्‍या नावाखाली कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्‍याचा आरोप अभिनेत्री शिल्‍पा शेट्‍टी व तिची आई सुनंदा शेट्‍टी यांच्‍यावर करण्‍यात आला आहे.

शिल्‍पा व सुनंदा शेट्‍टी यांनी ‘आयोसिस स्‍लिमिंग स्‍किन सलून व स्‍पा’ नावाने कंपनी सुरु केली. याची एक शाखा राजधानी दिल्‍लीत सुरु करण्‍याची घोषणाही केली. ही शाखा सुरु करण्‍यासाठी कंपनीच्‍या अधिकार्‍यांनी कोट्यवधी रुपये घेतले असल्‍याची तक्रार विभूतिखंड पोलिस ठाण्‍यात ज्‍योत्‍स्‍ना चौहान तर हजरतगंज पोलिस ठाण्‍यात रोहित वीर सिंह यांनी केली होती. या दोन्‍ही तक्रारींची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे.

एक महिन्‍यापूर्वी पाेलिसांनी बजावली हाेती नाटीस

कोट्यवधी रुपयांच्‍या फसवणूक प्रकरणाच्‍या तपासात शिल्‍पा शेट्‍टी व सुनंदा शेट्‍टी यांचे नाव समोर आले. हजरतगंज पोलिसांनी एक महिन्‍यांपूर्वी दोघींना नोटीसही पाठवली. तर विभूतिखंड पोलिस ठाण्‍याचे पथक मुंबईत जावून चाैकशी करेल, अशी माहिती पोलिस अधीक्षक अनूप सिंह यांनी दिली.

ज्‍योत्‍स्‍ना चौहान यांनी जून २०२०मध्‍ये दिलेल्‍या तक्रारीत म्‍हटले आहे की, ‘आयोसिस स्‍लिमिंग स्‍किन सलून व स्‍पा’ कंपनीचे अधिकारी किरण वावा, विनय भसीन, अनिका चतुर्वेदी, इशरफिल, नवनीत कौर, आशा पूनम झाला यांच्‍यासह अन्‍य काहींनी सुमारे अडीच कोटी रुपये घेतले. त्‍यांनी सेंटर सुरु करण्‍यासाठी साहित्‍य पाठवले. त्‍याचबराेबर खोटी बिलेही पाठवली. तसेच सेंटरचे उद्‍घाटन बॉलीवूड अनिनेत्रींच्‍या हस्‍ते होईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र उद्‍घाटनापूर्वी आश्‍वासन पूर्ण करण्‍यास असमर्थता दर्शवल्‍याचे तक्रारीमध्‍ये म्‍हटले आहे.

फिर्यादींनी दिलेल्‍या माहितीनुसार, या प्रकरणी विविध कलमांन्‍यवे गुन्‍हे दाखल करण्‍यात आले आहेत. हे प्रकरण हायप्रोफाईल असल्‍याने पोलिस अधीक्षक पूर्वी संजीव सुमन या प्रकरणाचा तपास करीत आहे.

एक पथक सोमवारी मुंबईला रवान होईल. हे पथक शिल्‍पा शेट्‍टी व सुनंदा शेट्‍टी यांची चौकशी करणार आहे.

याप्रकरणी ठोस पुरावे मिळाल्‍यानंतर दोघींना अटकही होवू शकते, अशी माहिती पोलिस अधीक्षक अनूप सिंह यांनी दिली.

आता लखनौ पोलिसांच्‍या चौकशीनंतरच या प्रकरणातील वस्‍तुनिष्‍ठ माहिती समोर येणार आहे.

पती राज कुंद्राच्‍या पॉर्न व्‍हिडीओ रॅकटेप्रकरणी शिल्‍पा शेट्‍टीची चौकशी झाली आहे. तिने आपल्‍या या प्रकाराची माहिती नसल्‍याचा दावा केला आहे.

यानंतर एक निवेदन प्रसिद्‍ध करत पॉर्न व्‍हिडीओ रॅकटेप्रकरणी आपल्‍या कुटुंबावर निराधार आरोप करु नयेत, माझ्‍या मुलांची प्रायव्‍हसी जपावी, असे आवाहनही तिने केले होते.आता आर्थिक फसणवूक प्रकरणी शिल्‍पा शेट्‍टी पुन्‍हा एकदा अडचणीत आली आहे.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडीओ : 91 वर्षा पूर्वीची गाडी जपतायत पुण्याचे डॉ. गुर्जर

Back to top button