कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'पुढारी'कार पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमालेत प्रसिद्ध विचारक, लेखक आणि केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर यांचे शुक्रवार, दि. 20 मे रोजी सायंकाळी 5 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे व्याख्यान होणार आहे. 'भारत एक जागतिक महासत्ता' या विषयावर ते पुष्प गुंफणार आहेत. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के हे अध्यक्षस्थान भूषविणार असून, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील हे प्रमुख उपस्थित असणार आहेत.
उदय माहुरकर हे सध्या केंद्रीय माहिती आयुक्त म्हणून नवी दिल्लीत काम पाहत आहेत. केंद्रीय माहिती अधिकार न्यायालयाचे ते न्यायमूर्ती आहेत. केंद्रीय माहिती आयुक्तपदावर येण्यापूर्वी गेली 33 वर्षे त्यांनी 'इंडिया टुडे' या नामांकित मासिकाचे राजकीय विश्लेषक म्हणून विशेष भूमिका बजावली आहे. राजकीय विश्लेषक या नात्याने 2008 ते 2010 या कालावधीत 'इंडिया टुडे'मध्ये लिखाण करीत असताना त्यांनी स्वतःचा वाचकवर्ग निर्माण केला. अचूक राजकीय विश्लेषक, असा त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. त्यांनीच पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी येणार, असे विश्लेषण केले होते. ते अचूक ठरले.
या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले आहे.