Cannes : कान्समध्ये ‘हे’ तीन मराठी चित्रपट सहभागी होणार | पुढारी

Cannes : कान्समध्ये 'हे' तीन मराठी चित्रपट सहभागी होणार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या तीन मराठी चित्रपटांची कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात (Cannes) सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. (Cannes)

दरवर्षीप्रमाणे कान्स (फ्रान्स) येथे १७ मे ते २८ मे दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय ग्राहक मिळवून देणे, देशातील चित्रिकरण व पर्यटन स्थळांचे महत्व वाढविणे या हेतुने मराठी चित्रपटांचा सहभाग कान्स फिल्म फेस्टिव्हल (CFF) मध्ये महाराष्ट्र सरकारतर्फे करण्यात येतो. या महोत्सवात निवड झालेल्या मराठी चित्रपटांचे प्रतिनिधी सहभागी होतात.

या वर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हल (CFF) 2022 च्या फिल्म मार्केटिंग विभागासाठी महाराष्ट्र सरकारकडून पाठवावयाच्या ३ मराठी चित्रपटांच्या निवड प्रक्रियेसाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव अंतर्गत अशोक राणे, सतिश जकातदार, श्रीमती किशोरी शहाणे-विज, धीरज मेश्राम, मनोज कदम, महेंद्र तेरेदेसाई व दिलीप ठाकुर या ७ तज्ज्ञ सदस्यांची परीक्षण समिती गठीत करण्यात आली होती.

या समितीने ३२ चित्रपटांचे परीक्षण करुन एकमताने नटराज एन्टरटेनमेंट निर्मित “पोटरा”, नाईन आर्चस पिक्चर कंपनी निर्मित “कारखानीसांची वारी” आणि बीइंग क्रिएटिव्ह पिक्चर्स निर्मित “तिचं शहर होणं” या चित्रपटांची कान्स फिल्म फेस्टिव्हल (CFF) 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी केलेली शिफारस सरकारने मान्य केली आहे.

Back to top button