अभिनेत्री आसावरी जोशी आणि स्वागता शाह यांचा राष्ट्रवादीत प्रवेश | पुढारी

अभिनेत्री आसावरी जोशी आणि स्वागता शाह यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क

मराठी अभिनेत्री आसावरी जोशी यांनी आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अभिनेत्री आसावरी जोशी यांच्यासह अभिनेत्री स्वागता शाह यांनीही राष्ट्रवादीत पक्षात प्रवेश केला. चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग सेलचे राज्यप्रमुख बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने हा पक्ष प्रवेश झाला.

अरूण आडकर तसेच काँग्रेस पक्षाचे मावळ तालुका प्रवक्ते फिरोज शेख यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. नवी मुंबईचे अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष सुलतान मालदार यांच्या पुढाकाराने नंदू भोपी, जिल्हाध्यक्ष, रायगड, सरपंच, भारत चौधरी, कामगार नेता, तळोजा, भानुदास म्हात्रे, उपसरपंच, नितळम तसेच इतरांनाही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

आसावरी यांनी अनेक जाहिराती, मालिका आणि चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ‘ऑफिस ऑफिस’ या हिंदी मालिकेतील त्यांची भूमिका गाजली होती. ‘ओम शांती ओम’ या हिंदी चित्रपटात त्यांनी लव्हली कपूरची भूमिका साकारली होती. ‘स्वाभिवान: शोध अस्तित्वाचा’ या मालिकेत त्यांनी प्रोफेसर अदिती सूर्यवंशीची भूमिका साकारली. ही मालिका देखील चांगली गाजली.

आसावरी यांचा जन्म ६ मे, १९६५ रोजी मुंबईत झाला. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्यांनी रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. रंगभूमीवर काम करत असताना त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. पुढे ‘माझं घर माझा संसार’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ‘एक रात्र मंतरलेली’, ‘गोडी गुलाबी’, ‘बाल ब्रम्हचारी’ अशा काही चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.

Back to top button