नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा ; आयएसपी-सीएनपी प्रेससह प्रेस महामंडळातील मृत कामगारांच्या वारसांना ज्येष्ठतेनुसार कामावर घेण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली आहे. मजदूर संघाने याबाबत पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केल्याने हे यश मिळाल्याचे गोडसे यांनी नमूद केले आहे.
सन 2001 ची मृत वारसाची कोर्ट केस प्रलंबित होती. त्यामुळे अनेक दिवसांपासून या कोर्ट केसवरील स्थगिती उठविण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून संघटनेचे प्रयत्न सुरू होते. त्यातच कोविड संकटामुळे अनेक अडथळे आले. दोन वर्षे कोर्टाचे कामकाज ठप्प होते. प्रेसचे कोर्टाचे कामकाज सोलोमन अॅण्ड कंपनी मॅनेजमेंट बघत होती.
संघटनेने विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मॅनेजमेंटकडे आणखी एक सिनिअर सॉलिसिटरची मागणी केली. त्यानुसार महाराष्ट्राचे सॉलिसिटर जनरल आशुतोष कुंभकोणी यांची या केससाठी नियुक्ती करण्यात आली. या प्रकरणी हाय कोर्टात युक्तिवाद झाला आणि अनेक दिवसांचा स्टे हा व्हॅकेट झाल्याचा निकाल कोर्टाने दिला. 2012 नंतर कामगार पॅनलने प्रेसची सत्ता हाती घेतल्यावर मृत कामगारांच्या वारसांना नोकरीसाठी पाठपुरावा सुरू केला होता. त्याला यश येऊन 4 फेब—ुवारी 2013 व त्यानंतर मृत झालेल्या कामगारांच्या वारसाला नोकरी मिळेल, असे प्रेस महामंडळाचे अनुकंपा धोरण मंजूर करून घेतले. त्यानंतर दोन्ही प्रेससह देशभरातील अन्य प्रेसमध्ये मृत कामगारांच्या वारसांना नोकरी मिळवून देण्यात संघटनेला यश आले. सुरुवातीला या धोरणामध्ये शिक्षण, वय तसेच नऊ युनिटची एकत्रित ज्येष्ठता आदी अटी होत्या. संघटनेने सुरुवातीला धोरण यशस्वीपणे अंमलात आणून नंतर सर्व अटी शिथिल करून घेतल्या.
कामगारांनी 2012 मध्ये पॅनलला संधी दिली. त्यानंतर सलग चार वेळा सत्ता दिली. मी अनुकंपा तत्त्वावर प्रेसमध्ये कामाला लागलो. त्यामुळे मृत कामगारांच्या वारसाचा प्रश्न निकाली निघाल्याने विशेष आनंद होत आहे.
– जगदीश गोडसे, सरचिटणीस,
प्रेस मजदूर संघ2000 मध्ये मृत कामगाराचा शेवटचा वारस कामगार पॅनलच्या सत्ताकाळात प्रेसमध्ये सेवेत घेतला गेला होता. आता कामगार पॅनलच्या सत्ताकाळातच वारसांचा महत्त्वाचा प्रश्न निकाली निघाल्याने मोठे समाधान आहे.
– ज्ञानेश्वर जुंद्रे, कार्याध्यक्ष,
प्रेस मजदूर संघ