सातारा : शड्डू अन् पैजांनी मराठी विश्‍व कुस्तीमय

सातारा : शड्डू अन् पैजांनी मराठी विश्‍व कुस्तीमय
Published on
Updated on

सातारा : विशाल गुजर
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू झाली की कुस्ती क्षेत्रात चैतन्याचे वारे वाहू लागते. कुस्तीशौकिनांच्या नजरा आखाड्याकडेच असतात. गत महाराष्ट्र केसरी विजेत्यांचे कौतुक आणि चालू वर्षीचा मानकरी कोण? यावर चर्चेला उधाण येते. कोणता मल्ल मैदान गाजवणार, कोणचा पठ्ठा गदा उंचवणार, कोणती तालमी किताब जिंकण्यासाठी वर्चस्व राखणार यावर पैजा लागणे सुरू झाले आहे. स्पर्धेची अंतिम लढत येताच दिवस-रात्र आखाडे सरावाने घुमू लागतात. महाराष्ट्र केसरी नावाचे हे वलय सार्‍या मराठी विश्‍वाला कुस्तीमय करून जाते
महाराष्ट्रीय माणसाच्या नसा-नसात 'महाराष्ट्र केसरी' भिनलेली आहे. महाराष्ट्र केसरी किताब प्राप्त करणार्‍या कुस्तीगीरास सामाजिक प्रतिष्ठा आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी विज्ञान अशा विविध क्षेत्रात ज्याप्रमाणे विशेष कार्य करणार्‍यांचे कौतुक व हयातीपर्यंत सामाजिक प्रतिष्ठा असते. त्याचप्रमाणे हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी मल्लांना प्रतिष्ठा असते. लोक अशा मल्लांना कोणत्याही कार्यक्रमात विशेष सन्मान देतात. कुस्ती क्षेत्रात तर या व्यक्तींचे कायमस्वरूपी स्वागत होत असते.

सुरूवातीपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि राज्य कुस्तीगीर परिषदेचे अधिवेशन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. पूर्वी जेथे अधिवेशन आयोजित केले जायचे, तेथे केसरी स्पर्धा रंगायची. अधिवेशनात महत्त्वाचे ठराव मांडले जायचे. मुख्यमंत्री या ठरावानंतर ठोस आश्‍वासने द्यायचे. मैदानाबाहेर होणार्‍या अधिवेशनामुळे मैदानातील खेळाचा आलेख उंचावत जायचा. प्रारंभी केसरी पदाला विशेष महत्त्व नव्हते. अधिवेशनातील एक भाग म्हणून केसरी स्पर्धा होत होती. गदेपलीकडे अजिंक्यवीराला काहीच प्राप्त होत नसे. यामुळेच पुण्यातील पहिले महाराष्ट्र केसरी रघुनाथ पवार हे नाव अनेकांना माहीत नाही. 80 च्या दशकानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा चेहरामोहराच बदलून गेला. अधिवेशनापेक्षा स्पर्धेचे महत्त्व वाढले आणि जेथे स्पर्धा होऊ लागल्या तेथे परिषदेची सर्वसाधारण बैठक घेतली जाऊ लागली. तरीही स्पर्धा आणि अधिवेशन हा एक अविभाज्य घटक आजही आहे.

पूर्वी हौशी व विद्यार्थी गटात स्पर्धा होत असे. जे मल्ल शाळेत जात नसे त्यांचा समावेश हौशी गटात मातीवर खेळायचे. तर जे कुस्तीगीर शाळेत जात ते विद्यार्थी गटात मातीवर खेळायचे. चाळीसगावमधील अनिर्णित झालेल्या महाराष्ट्र केसरीपर्यंत केसरीच्या किताबासाठी 20 मिनिटांची मातीवर लढत व्हायची. अहमदनगर येथे झालेल्या 88 च्या अधिवेशनापासून गादीवर अंतिम कुस्ती खेळवण्याची नवी परंपरा सुरू झाली. यावेळी माती की गादी असा वाद अनेक दिवस रंगला. परंतु महाराट्रातील मल्लांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॅटच्या कुस्तीत पदके जिंकावीत यासाठी मॅटवर ऑलिम्पिक नियमानुसारच स्पर्धा घेण्याची प्रथा कालांतराने रूजली. 20 मिनिटांची कुस्तीची पध्दत बंद करून 3-3 मिनिटांच्या 2 फेर्‍या जिंकत सर्वप्रथम गादीवर आंतरराष्ट्रीय नियमानुसार महाराष्ट्र केसरीचा किताब सोलापूरच्या रावसाहेब मगर यांनी पटकवला. तेव्हापासून महाराष्ट्र केसरी स्पर्धेनेही कात टाकली. मैदानावरील स्पर्धा मैदानाबाहेरही आधुनिक बनत गेली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आता केवळ मॅटवर स्पर्धा खेळवली जाते. तरीही मातीवरील परंपरा जपण्यासाठीच महाराष्ट्र केसरी स्पर्धेला विशेष महत्व आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगर परिषद अनेक स्पर्धा वर्षभर भरवते. मात्र, मातीवर असणारी एकमेव स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी स्पर्धा होय. पारंपारिक फ्री स्टाईल पध्दतीने महाराष्ट्र केसरी स्पर्धा होते. गादी आणि मातीवर राज्यस्पर्धा भरवून राष्ट्रीय स्पर्धेत संघ पाठवणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वात जास्त लोकप्रिय स्पर्धेचा मान केवळ महाराष्ट्र केसरीला मिळाला आहे. राज्यात क्रिकेट लोकप्रिय असले तरी सार्‍या राज्यातून दरवर्षी 50 हजारांपेक्षा अधिक कुस्तीशौकिन महाराष्ट्र केसरीचा आंनद लुटत असतात. महाराष्ट्र केसरीसारखा अपूर्व सोहळा वर्षातून एकदाच येतो. जो विजेता होतो त्याच्या जीवनातील तो दिवस सोनेरी असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news