पुढारी ऑनलाईन डेस्क
संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा ग्रॅमी (Grammys 2022) पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या इंडियन अमेरिकन गायिका फाल्गुनी शाह (Falguni Shah) हिला 'ए कलरफुल वर्ल्ड'साठी बेस्ट चिल्ड्रेन म्युझिक अल्बम कॅटगरीत ग्रॅमी पुरस्कार मिळाला. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विट करत फाल्गुनी शाह यांचे अभिनंदन केले आहे. "सर्वोत्कृष्ट बाल संगीत अल्बमचा (Best Children's Music Album) ग्रॅमी पुरस्कार जिंकल्याबद्दल फाल्गुनी शाह यांचे अभिनंदन. भावी वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा." असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
संगीत क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय ग्रॅमी पुरस्काराने मूळ दोन भारतीयांनाही सन्मानित करण्यात आले. म्युझिशियन रिकी केज व इंडियन अमेरिकन गायिका फाल्गुनी शाह अशी या ग्रॅमी पुरस्कार प्राप्त मूळ भारतीयांची नावे आहेत.
संगीतकार रिकी केज यांचा हा दुसरा ग्रॅमी अॅवॉर्ड आहे. त्यांना ६४ व्या ग्रॅमी अॅवॉर्डस्मध्ये बेस्ट न्यू एज एलबम कॅटेगरीतील पुरस्कार स्टिवर्ट यांच्यासोबत विभागून मिळाला. रिकीने पुरस्कार मिळाल्याबद्दल ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. त्याने आपल्या चाहत्यांना सांगितले की, आज आम्हाला 'डिवाईन टाईडस्' या अल्बमसाठी ग्रॅमी अॅवॉर्ड मिळाला. आपल्या सर्वांच्या सहकार्य व प्रेमामुळेच आम्हाला हे यश मिळाले आहे. आमचे अस्तित्व तुमच्यामुळेच टिकून आहे.
दरम्यान, भारतीय-अमेरिकन गायिका फाल्गुनी शाह हिने बेस्ट चिल्ड्रेन म्युझिक गटाचा ग्रॅमी पुरस्कार पटकावला. तिला 'अ कलरफुल वर्ल्ड' अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिने इंस्टाग्रामवर लिहिले आहे की, आज माझ्याकडे भावना व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीत. ग्रॅमी पुरस्कार मिळणे, ही सन्मानाची बाब आहे. ६४ वा वार्षिक ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी जगरातील दिग्गज संगीतकार, गायक आणि कंपोजर्स उपस्थित होते. यातील अनेकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बेस्ट न्यू आर्टिस्टचा पुरस्कार ऑलिविया रॉड्रिगोला मिळाला.