पुढारी आनलाईन डेस्क
ग्रॅमी पुरस्कार २०२२ (Grammy Awards 2022) च्या सोहळ्यात यावर्षी अनेक दिग्गजांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संगीत क्षेत्रातील हा सर्वात मोठा पुरस्कार सोहळा आहे. (Grammy Awards 2022) या सोहळ्यात अनेक दिग्गज, नामवंत कलाकार उपस्थित होते. लास वेगासमधील एमजीएम ग्रँड गार्डन एरिना येथे ग्रॅमी पुरस्कार प्रदान केले गेले. यापूर्वी हा सोहळा ३१ जानेवारीला अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे होणार होता. परंतु ओमाक्रॉनमुळे त्याची तारीख आणि ठिकाण बदलण्यात आले. हा पुरस्कार १९५९ पासून दरवर्षी दिला जातो. यामध्ये प्रमुख कलाकारांना त्यांच्या अमूल्य कामगिरीसाठी सन्मानित केले जाते. जॉन बॅटिस्ट यांना यावेळी सर्वाधिक नामांकन मिळाले आहेत.
गायिका ऑलिव्हिया रॉड्रिगोने या सोहळ्यात तिच्या हिट गाण्यावर धमाकेदार परफॉर्मन्स दिला. त्याचवेळी, पुरस्कार सोहळ्याचे होस्ट ट्रेव्हर नोह यांनी फिनीस आडनावाची खिल्ली उडवली आणि ते म्हणाले की, ते लोकांची आडनावे आपल्या तोंडी घेणार नाहीत. यावेळी ट्रेव्हरने विल स्मिथच्या थप्पड प्रकरणाचीही खिल्ली उडवली.
"लीव्ह द डोर ओपन" ला सॉन्ग ऑफ द इयरसाठी ग्रॅमी ॲवॉर्ड मिळाला. हे गाणे ब्रुनो मार्स आणि अँडरसन पाक यांनी संगीतबद्ध केले आहे. त्यांना 'सिल्क सोनिक' देखील म्हणतात. लोकप्रिय दक्षिण कोरियन के-पॉप बँड बीटीएसने त्यांच्या 'बटर' गाण्यावर ग्रॅमीजमध्ये परफॉर्म केला. तसेच स्टार्टिंग ओव्हरने सर्वोत्कृष्ट कंट्री अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार जिंकला.
अमेरिकन गायक आणि गीतकार ख्रिस स्टॅपलटनच्या स्टार्टिंग ओव्हर या अल्बमला सर्वोत्कृष्ट कंट्री अल्बमचा ग्रॅमी पुरस्कार मिळाला. ॲवॉर्ड्स नाईटमध्ये बिली इलिशने जेम्स बाँडचे नो टाइम टू डाय गाणे सादर केले. नो टाईम टू डाय या गाण्यासाठी बिलीला ऑस्करही मिळाला आहे.
अमेरिकन गायिका आणि गीतकार ऑलिव्हिया रॉड्रिगो हिने ड्रायव्हर्स लायसन्ससाठी सर्वोत्कृष्ट पॉप सोलो न्यू आर्टिस्टचा ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. ऑलिव्हियाचा हा पहिला ग्रॅमी पुरस्कार आहे. कान्ये वेस्टने द वीकेंडसाठी सर्वोत्कृष्ट रॅप गाण्याचा ग्रॅमी जिंकला.
भारतीय दिग्गज संगीतकार ए आर रहमान आपल्या मुलासमवेत ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाले होते.
बेबी किमला सर्वोत्कृष्ट रॅपसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला. लकी डेला सर्वोत्कृष्ट प्रोग्रेसिव्ह अल्बम पुरस्कार मिळाला.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी एक व्हिडिओ संदेश पाठवला. या पुरस्कार सोहळ्यात रशिया-युक्रेनमधील युद्धात मारल्या गेलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
Heaux Tales ला सर्वोत्कृष्ट R&B अल्बमचा पुरस्कार मिळाला. लेडी गागाने जबरदस्त एन्ट्री घेत उत्कृष्ट सादरीकरण केले.
ऑलिव्हिया रॉड्रिगोने पॉप व्होकल अल्बमसाठी तिचा दुसरा ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे.
दरम्यान, ग्रॅमी ॲवॉर्ड्स २०२२ मध्ये इन मेमोरिअम विभागात लता मंगेशकर आणि बप्पी लाहिरी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली नाही.