'बॉस माझी लाडाची'मधून भाग्यश्री लिमये हिचं पुनरागमन | पुढारी

'बॉस माझी लाडाची'मधून भाग्यश्री लिमये हिचं पुनरागमन

पुढारी ऑनलाईन

सोनी मराठी वाहिनी नेहमीच नवनवीन विषय हाताळत असते. अशीच एक नवी कोरी मालिका सोनी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘बॉस माझी लाडाची’ या आगामी मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना नुकताच पाहायला मिळाला. अभिनेत्री भाग्यश्री लिमये, नवोदित अभिनेता आयुश संजीव हे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. भाग्यश्री लिमये हिच्या नव्या भूमिकेची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागून राहिली आहे.

गिरीश ओक, रोहिणी हट्टंगडी हे नावाजलेले कलाकारही या प्रोमोत दिसताहेत. मनवा नाईक हिच्या स्ट्रॉबेरी या निर्मिती संस्थेची ही मालिका आहे.

या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. एकत्र कुटुंबात रविवारी काय करायचं याची चर्चा सुरू आहे आणि तेवढ्यात मालिकेची नायिका येते आणि नायकाला ऑफिससाठी तयार व्हायला सांगते. निवांत असलेला नायक वेळ आहे म्हणून तसाच लोळत पडलाय. ऑफिसमध्ये गेल्यावर नायिकाच त्याची बॉस आहे हे कळतं आणि त्याच वेळी नायक ‘घरात बायकोशी आणि ऑफिसमध्ये बॉसशी पंगा नाही घ्यायचा असं म्हणतो.

या प्रोमोवर प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिक्रिया आल्या असून सगळ्यांना ही नवी मालिका बघण्याची उत्सुकता लागली आहे. लवकरच सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

Back to top button