प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात ‘खिसा’ सर्वोत्कृष्ट | पुढारी

प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात ‘खिसा’ सर्वोत्कृष्ट

पुढारी ऑनलाईन: ‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात’ ‘खिसा’ या लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपटाचा मान मिळवला आहे. याच लघुपटासाठी राज मोरे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर वेदांत क्षीरसागर सर्वोत्कृष्ट बालकलाकार ठरला आहे.

मदन काळे दिग्दर्शित ‘लगाम’ या लघुपटाला दुसऱ्या क्रमांकाचे तर विराज झुंजारराव दिग्दर्शित ‘साईड मिरर’ला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे अभिनेते संदीप कुलकर्णी, प्रबोधन गोरेगावचे संस्थापक व महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, अशोक राणे, दिग्दर्शक निखील महाजन, प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितिन शिंदे आदी उपस्थित होते.

राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधन गोरेगावच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने पहिला प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाटय़मंदिर येथे शुक्रवारी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि प्रसिध्द अभिनेते संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. ( आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात ‘खिसा’ )

यावेळी प्रवीण खाडे दिग्दर्शित ‘ताजमहाल’ हा सामाजिक महाराष्ट्र या विषयावरील सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला. तर ‘वन्स ही डिड अटीनएज पेंटिंग’ या लघुपटासाठी दीक्षा सोनावणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. या महोत्सवात ७७ मराठी लघुपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यामधून १५ लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. यातून सर्वोत्कृष्ट लघुपटाची निवड करण्यात आली आहे. यावेळी इफ्फी महोत्सवात जागतिक स्पर्धा विभागात पुरस्कार पटकावणाऱ्या ‘गोदावरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांचा विशेष गौरव करण्यात आला.

‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा’चे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी लघुपट यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. तर या समारंभाचे प्रमुख पाहुणे अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी नवीन टेक्नॉलॉजी येते, फॉरमॅट्स बदलतात, सगळं काही बदलतं, मात्र, कलाकार तोच राहतो, थियटरमधून, टेलिव्हिजन, चित्रपटातून सतत वेगळ पहायला मिळते, असे सांगितले.

मराठी कलावंतांनी निर्माण केलेल्या कलाकृती जगभरात नावाजल्या जाव्यात या उद्देशाने ‘कान्स’, ‘ओबरहौसेन’ (जर्मनी), कार्लोवी वेरी (झेक रिपब्लिक) या तीन सर्वोत्कृष्ट जागतिक आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये पाठविण्यासाठी पाच लघुपटांची निवड करण्यात आली. या महोत्सवाचे परिक्षण मोनालिसा मुखर्जी, मंदार कमलापूरकर, समीक्षक पत्रकार लेखक गणेश मतकरी, मनोज कदम व विजय कलमकर यांनी केले.

करोनाचे सर्व नियम पाळून मोजक्याच कलावंताच्या उपस्थितीत हा सोहळा मुंबईत पार पडला. या प्रसंगी ’५२ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ जागतिक स्पर्धा विभागात पुरस्कार मिळविणाऱ्या ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटातील प्रमुख अभिनेते जितेंद्र जोशी यांचा विशेष सन्मान होणार होता. मात्र, जितेंद्र जोशी कोरोनाग्रस्त असल्याने त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्वांशी संवाद साधला.

महोत्सवातील पुरस्कार विजेते लघुपट

‘खिसा’ सर्वोत्कृष्ट लघुपट – प्रथम पुरस्कार
‘लगाम’ सर्वोत्कृष्ट लघुपट – द्वितीय पुरस्कार
‘साईड मिरर’ सर्वोत्कृष्ट लघुपट – तृतीय पुरस्कार
‘ताजमहाल’ सर्वोत्कृष्ट लघुपट सामाजिक लघुपट

कान्स, ओबरहौसेन जर्मनी, कार्लोवी वेरी (झेक रिपब्लिक) या तीन सर्वोत्कृष्ट जागतिक महोत्सवांमध्ये पाठविण्यासाठी निवड झालेले लघुपट

१. अर्जुन / दिग्दर्शक: शिवराज वाईचळ
२. बटर चिकन / दिग्दर्शक: मयुरेश वेंगुर्लेकर
३. साईड मिरर / दिग्दर्शक: विराज झुंजारराव
४. लगाम / दिग्दर्शक: मदन काळे
५. ताजमहाल / दिग्दर्शक: प्रविण खाडे

वैयक्तिक पुरस्कार

सर्वोत्कृष्ट अभिनेता – हरीश बारस्कर – (ताजमहाल)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार – वेदांत क्षीरसागर – (खिसा)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – राज मोरे – (खिसा)
सर्वोत्कृष्ट पटकथालेखक – कैलास वाघमारे – (खिसा)
सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार – किरण जाधव – (लगाम)
सर्वोत्कृष्ट संकलक मयुरेश वेंगुर्लेकर – (बटर चिकन)
सर्वोत्कृष्ट ध्वनि – अनमोल भावे – (अर्जुन)

हेही वाचलंत का? 

Back to top button