टिकटॉक फेम सूरज चव्हाण झळकणार "का रं देवा" चित्रपटात | पुढारी

टिकटॉक फेम सूरज चव्हाण झळकणार "का रं देवा" चित्रपटात

पुढारी ऑनलाईन

टिकटॉक फेम सूरज चव्हाण “का रं देवा” चित्रपटात झळकणार आहे. आपल्या बोबड्या भाषेत संवाद साधणारा आणि तमाम लोकांना आपल्या “गोलीगत” आणि “बुक्कीत टेंगुळ” या प्रसिद्ध डायलॉगने आनंद देणारा सूरज चव्हाण रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. सह्याद्री फिल्म प्रॉडक्शनच्या प्रशांत शिंगटे निर्मित “का रं देवा” या आगामी मराठी चित्रपटात तो दिसणार आहे.

बारामती तालुक्‍यातील मोडवे गावचा रहिवासी असलेल्या सूरज चव्हाण याचे आयुष्य खूपच खडतर आहे. आई-वडिलांचे छत्र हरपलेला हा मुलगा अवघ्या महाराष्ट्राला आपले आई-वडील मानतो. लहानपणापासूनच तो बोबडा बोलतो. बोबडे बोलणे हे त्याचे शारीरिक व्यंग, मात्र त्याचे व्यंगच त्याचे बलस्थान ठरले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने लोकांना आपलेसे केले.

नवोदित कलाकारांच्या पाठीशी उभे राहणारे या चित्रपटाचे निर्माते प्रशांत शिंगटे यांची भेटही सुरज सोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. त्यांनी सुरजला आपल्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली.

टिकटॉकने मला रातोरात मोठे केले आणि मी जगभरात पोहचलो. प्रशांतजी मला स्वतः भेटायला माझ्या घरी आले आणि त्यांनी मला ही ऑफर दिली. तेव्हा मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. लिहिता वाचता न येणाऱ्या माझ्यासारख्या मुलाला एक निर्माता शोधत घरापर्यंत पोहचतो ही कल्पनाच मी करू शकत नव्हतो. माझ्या शैलीला साजेशी अशी कॉलेजमधल्या मुलाची भूमिका मी साकारली आहे. प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे, असे तो म्हणाला.

चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन रंजीत दशरथ जाधव यांचं आहे. अभिनेत्री मोनालिसा बागल, मयूर लाड, अभिनेते जयवंत वाडकर, अरुण नलावडे आणि नागेश भोसले यांच्या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. फेब्रुवारी महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Back to top button