

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या १०० कोटी वसूली, भ्रष्टाचार आणि गैरकारभाराच्या आरोपांप्रकरणी तपास करत असलेल्या सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी नोंदविलेल्या जबाबात काही धक्कादायक खुलासे केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे देशमुख यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. (Sitaram Kunte)
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपांवरुन मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) प्राथमिक तपास करुन गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्याच्या आधारे ईडीसुद्धा गुन्हा दाखल करुन तपास करत आहे. ०७ डिसेंबर रोजी कुंटे यांनी ईडीसमोर आपला जबाब नोंदविला. यात त्यांनी देशमुख हे गृहमंत्री असताना आपल्याकडे पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे अशी कबुली दिली आहे.
बदलीसाठी नाव असलेल्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याची कुठल्या जागी आणि कोणत्या पदावर बदली करायची, हेसुद्धा त्यात नमूद केलेले असायचे. देशमुख यांचा स्वीय सहायक संजीव पालांडे यांच्यामार्फत या अनधिकृत याद्या माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात होत्या.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अधीन काम करत असल्याने संबंधित याद्या स्वीकारण्यास नकार देऊ शकत नव्हतो. त्यामुळे पोलीसांच्या बदल्या करताना या नावांचा समावेश केला जायचा, अशी माहिती कुंटे यांनी ईडी चौकशीदरम्यान दिल्याचे समजते.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही पोलीसांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुख यांच्या हस्तक्षेपाविषयी ईडीला माहिती दिली होती. जुलै २०२० मध्ये मुंबईतील १० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले होते. त्यावेळी परमबीर सिंग यांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी सल्लामसलत केली नव्हती.
मात्र, त्यानंतर दोन दिवसांनी सीताराम कुंटे यांचा व्हॉटसअॅप मेसेज आला होता. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बदल्या रद्द करण्याचे आदेश दिल्याचे नमूद होते, अशी माहिती सिंग यांनी ईडीला जबाबात दिली होती. त्यानंतर आता कुंटे यांच्या या जबाबामुळेच देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, ईडीकडून अटक झाल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेले अनिल देशमुख हे सातत्याने जामीन मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु, आता सीताराम कुंटे यांच्या जबानीनंतर ईडीकडून देशमुख यांच्याविरुद्ध कोणते नवे पाऊल उचलले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ईडीने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये अनिल देशमुख आणि त्यांच्या दोन मुलांविरोधात सात हजार पानी पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. त्यापूर्वी या प्रकरणात ईडीने देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे व स्वीय सहायक कुंदन शिंदे यांच्यासह 14 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.