Pune School Reopen : पुण्यातील शाळांची १ तारखेपासून घंटा वाजणार | पुढारी

Pune School Reopen : पुण्यातील शाळांची १ तारखेपासून घंटा वाजणार

पिंपरी ; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड महापलिका शाळांमधील सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वी चे वर्ग येत्या १ फेब्रुवारीपासून अर्धसत्र कालावधीत सुरु करण्यास आयुक्त राजेश पाटील यांनी परवानगी दिली आहे. (Pune School Reopen)

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शाळा सुरु करण्यासाठी महाराष्ट्र शासन परिपत्रकातील अतिरिक्त मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन आयुक्तांनी शाळा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.

यासाठी शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण, जंतूनाशक, साबण, पाणी आदी आवश्यक वस्तूंची उपलब्ध करण्यात यावी. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण करण्यात यावे.

शाळेतील ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झाले नाहीत अशा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना ४८ तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे.

त्याबाबतचे प्रमाणपत्र शाळेत दफ्तरी ठेवण्यात यावे. वर्गखोली तसेच स्टाफरुम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमानुसार असावे.

Koo App

शाळा-महाविद्यालये १ फेब्रुवारीपासून ! कोरोना रुग्णसंख्येतील घट लक्षात घेत पुणे मनपा हद्दीतील शाळा-महाविद्यालये येत्या १ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय पालकमंत्री आढावा बैठकीत घेण्यात आला असून इ. १ ली ते ८ वी पर्यंतच्या शाळा अर्धवेळ आणि पुढील वर्ग पूर्णवेळ सुरु असणार आहेत.

Murlidhar Mohol (@MurlidharKMohol) 29 Jan 2022

Pune School Reopen : कोरोना नियमांचे पालन करूनच प्रवेश

शाळेत दर्शनी भागावर मास्कचा वापर आदी संदर्भात मार्गदर्शक सूचना लावण्यात याव्यात. शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरिता किमान ६ फुट इतकी शारीरिक अंतर राखले जाईल याकरिता विशिष्ट चिन्हांकन करण्यात यावे.

विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची लेखी संमती शाळा प्रमुखांनी प्राप्त करुन घ्यावी. शाळेतील स्वच्छतागृहाचे वारंवार निर्जंतुकीकरणकरण्यात यावे या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन शाळा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

गेल्या वर्षी १६ डिसेंबर २०२१ रोजी १ ली ते ८ वी पर्यतचे वर्ग सुरु करण्यात आले होते. मात्र, ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा पंधरात दिवसातच शाळा बंद कराव्या लागल्या. पुढील ३० डिसेंबरनंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय झाला होता.

जानेवारी २०२२ पासून कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे शाळा सुरु करण्यावर निर्णय घेण्यात आला नाही. सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण घटत आहे. त्यामुळे येत्या मंगळवारपासून शहरातील शाळा पुन्हा गजबजणार आहेत.

Back to top button