Share Market Closing | RBI च्या निर्णयावर शेअर बाजाराने कसा दिला प्रतिसाद! वाचा आज काय घडलं बाजारात?

Share Market Closing | RBI च्या निर्णयावर शेअर बाजाराने कसा दिला प्रतिसाद! वाचा आज काय घडलं बाजारात?
Published on
Updated on

Share Market Closing : कमकुवत जागतिक संकेतांमुळे आज गुरुवारी (दि.६) शेअर बाजार लाल चिन्हात खुला झाला होता. पण आरबीआयच्या पतधोरण निर्णयानंतर शेअर बाजाराने यू-टर्न घेतला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज गुरुवारी (दि.६) पतधोरण जाहीर करताना रेपो दरात (repo rate) कोणतीही वाढ केलेली नाही. रेपो दर ६.५ टक्के एवढाच कायम राहणार असल्याचे RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी म्हटले. फेब्रुवारीमध्ये झालेल्या शेवटच्या पतधोरण बैठकीत आरबीआयने पॉलिसी रेट म्हणजेच रेपो रेट २५ बेसिस पॉइंट्सने वाढवून ६.५० टक्के केला होता. तो कायम ठेवण्यात आला. या निर्णयानंतर शेअर बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाले. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने आज सुरुवातीच्या व्यवहारातील घसरण मागे टाकत तेजीत व्यवहार केला. आज सेन्सेक्स १४३ अंकांच्या वाढीसह ५९,८३२ वर बंद झाला. तर निफ्टी ४२ अंकांनी वाढून १७,५९९ वर स्थिरावला.

आज बँकिंग, रियल्टी शेअर्स तेजीत राहिले. तर आयटी आणि मेटल स्टॉकवर दबाव राहिला. आजच्या व्यवहारात अदानी एंटरप्रायजेसचा शेअर्स टॉप गेनर्स होता. हा शेअर जवळपास ४ टक्के वाढला. तर एचसीएल टेक हा टॉप लूजर्स होता.

सुरुवातीला सेन्सेक्स १०० अंकांहून अधिक घसरला होता. पण आरबीआयच्या पतधोरण निर्णयानंतर शेअर बाजारात तेजी आली. सकाळी ११ च्या सुमारास सेन्सेक्स सुमारे २०० अंकांनी वाढून ५९,८90 वर पोहोचला. तर निफ्टी १७,६०० वर गेला होता. त्यानंतर ही तेजी कायम राहिली.

निफ्टी PSU Banks सुमारे १ टक्क्याने आणि निफ्टी रियल्टी सुमारे २ टक्के वाढला. FMCG स्टॉकमध्ये घसरण दिसून आली. निफ्टी IT स्टॉक्समध्ये एचसीएल टेक, टेक महिंद्रा, Coforge, Mphasis हे शेअर्स टॉप लूजर्स होते. शेअर बाजारात आज खालच्या स्तरावरुन जोरदार रिकव्हरी दिसून आली.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पतधोरण जाहीर होण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याने सुरुवातीच्या व्यवहारात दोन्ही निर्देशांक घसरले होते. बँकिंग शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला होता. पण आरबीआयच्या निर्णयानंतर बँकिंग स्टॉक्स वाढले.

'हे' शेअर्स वाढले, 'हे' घसरले

दुपारच्या सत्रात सेन्सेक्सवर बजाज फायनान्स (२ टक्के वाढ), टाटा मोटर्स (२.७४ टक्के वाढ) इंडसइंड बँक (१.३९ टक्के वाढ), बजाज फिनसर्व्ह (२.८० टक्के वाढ), एम अँड एम (१.३५ टक्के वाढ), सन फार्मा (१.४३ टक्के वाढ), रिलायन्स (०.८४ टक्के वाढ) हे शेअर्स वाढले होते. तर टाटा स्टील, पॉवर ग्रिड, एचसीएल टेक, नेस्ले, टेक महिंद्रा हे टॉप लूजर्स होते. निफ्टीवर बजाज फायनान्स, अदानी एंटरप्रायजेस, एसबीआय, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह हे तेजीत राहिले. तर ओएनजीसी, एचसीएल टेक, ब्रिटानिया, नेस्ले, कोल इंडिया घसरले होते. (Share Market Closing)

जागतिक बाजारातून सुस्त संकेत

जागतिक बाजारातून सुस्त संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर आज आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार दिसून आला. SGX निफ्टी काही प्रमाणात कमजोर दिसून आला. काल अमेरिकेच्या बाजारातून संमिश्र संकेत मिळाले होते. आर्थिक मंदीच्या धास्तीने बाजारावर दबाव निर्माण झाला आहे. कालच्या व्यवहारात अमेरिकेचा नॅस्डॅक निर्देशांक १ टक्क्यांहून अधिक घसरुन बंद झाला होता. S&P 500 निर्देशांकही लाल चिन्हात बंद झाला होता.

जीडीपी वाढ ६.५ टक्के राहण्याचा अंदाज

चालू र्आथिक वर्ष २०२३-२४ साठी जीडीपी वाढ ६.५ टक्के राहील, असा अंदाज RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केला आहे. बँकिंग आणि बिगर बँकिंग वित्तीय व्यवस्था सुस्थितीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एकूणच सध्याची महागाई लक्ष्यापेक्षा अधिक आहे; यामुळे सध्याचे पतधोरण अनुकूल असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. सध्याची आर्थिक स्थिती लवचिक आहे आणि आर्थिक वर्ष २०२३ मध्ये अर्थव्यवस्था ७ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news