Stock Market Crash
Stock Market Crash

Share Market Closing | शेअर बाजारात चौफेर विक्री, सेन्सेक्स- निफ्टी गडगडले, गुंतवणूकदारांना ३.९० लाख कोटींचा फटका

Published on

Share Market Closing : आशियाई बाजारातील कमजोरी स्थिती तसेच अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकटाच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी (दि. २०) भारतीय शेअर बाजारात हाहाकार उडाला. आजच्या व्यवहारात बँकिंग, फायनान्सियल आणि आयटी स्टॉक्सचे सर्वाधिक नुकसान झाले. सुरुवातीला सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला होता. तर निफ्टी १७ हजारांच्या खाली आला. तर दुपारच्या सत्रात सेन्सेक्स ९०० अंकांनी घसरून ५७ हजारांवर आला. तर निफ्टी २६६ अंकांच्या घसरणीसह १६,८३४ वर होता. त्यानंतर आज सेन्सेक्स ३६० अंकांच्या घसरणीसह ५७,६२८ वर बंद झाला. तर निफ्टी १११ अंकांनी घसरून १६,९८८ वर स्थिरावला.

आजच्या व्यवहारात बाजारात चौफेर विक्री दिसून आली. आयटी, मेटल, बँकिंगसह रियल्टी या स्टॉक्सना विक्रीचा अधिक फटका बसला. बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना सुमारे ३.९० लाख कोटींचा फटका बसला. बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज २५३.६२ लाख कोटींपर्यंत खाली आले. याआधीच्या सत्रात ते २५७.५२ लाख कोटींवर होते. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बंद झाल्याने बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. आता स्वित्झर्लंडमधील क्रेडिट सुईस बँक संकटात आहे. बँकिंग क्षेत्रातील या संकटाच्या पार्श्वभूमीवर ९ मार्च पासून सेन्सेक्स सुमारे ३ हजार अंकांनी कमकुवत झाला आहे.

'या' दिग्गज स्टॉक्सना फटका

आजच्या व्यवहारात रिलायन्स, एसबीआय, इन्फोसिस आदी दिग्गज स्टॉक्समध्ये घसरण झाली. सेन्सेक्सवर इन्फोसिससह टीसीएस आणि इंडसइंड बँक हे टॉप लूजर्स होते. टाटा स्टील, एचडीएफसी, एम अँड एम आणि मारुती या शेअर्सदेखील नुकसान झाले. क्षेत्रीय निर्देशांकात निफ्टी मेटल आणि निफ्टी आयटी घसरले. आयटी शेअर्समधील घसरण २ टक्के होती. बँकिंग, फायनान्सियल, ऑटो, फार्मा, रिअल्टी, कंन्झूमर ड्युरेबल्स, ऑईल आणि गॅस स्टॉक्स हेदेखील घसरले. बँक निफ्टी ५५० अंकांनी खाली आला. सुरुवातीच्या व्यवहारात टायटन आणि हिंदुस्तान युनिलिव्हर हे वाढले होते. पण दुपारच्या सत्रात त्यात घसरण झाली. दुपारच्या सत्रात सर्व प्रमुख शेअर्स लाल चिन्हात व्यवहार करत होते.

IT स्टॉक्स, हे होते टॉप लूजर्स

MphasiS (-३.७२ टक्के), Coforge (-३.५४ टक्के), Tech Mahindra (-२.४० टक्के), Persistent Systems (-२.१९ टक्के) हे आयटीमधील टॉप लूजर्स होते.

अदानींच्या स्टॉक्सवर दबाव कायम

आजच्या व्यवहारातही अदानी समूहाच्या १० शेअर्सवर दबाव राहिला. अदानी एंटरप्रायजेस, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस हे ४ टक्क्यांनी खाली आले. अदानी विल्मर, अदानी पोर्टस्, अंबुजा सिमेंट, एनडीटीव्ही हे शेअर्सदेखील घसरले. दरम्यान, अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर सकाळच्या सत्रात सुमारे ३ टक्क्यांने वाढला होता. तर अदानी ट्रान्समिशनदेखील १.४८ टक्के वाढला होता. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समुहाने गुजरातमधील मुंद्रा येथील ३४,९०० कोटी रुपयांचा पेट्रोकेमिकल प्रकल्प स्थगित केल्याच्या वृत्तानंतर सोमवारी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स ३.४ टक्क्यांनी घसरले.

बँकिंग क्षेत्र संकटात, अमेरिकेसह आशियाई बाजार गडगडले

मध्यवर्ती बँकांनी अडचणीत असलेल्या बँकांना तरलता प्रदान करण्याचे आश्वासन दिले आहे. स्वित्झर्लंडमधील UBS बँक क्रेडिट सुईसचा ताबा घेणार घेणार आहे. तरीही अमेरिकेतील शेअर बाजारात विक्रीचा सपाटा दिसून आला. याचे पडसाद आशियाई बाजारात उमटले आहेत. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक २ टक्क्यांहून अधिक घसरला. जपानचा निक्केई निर्देशांक १.४२ टक्के घसरून २६,९४५ वर आला. सिडनी, सेऊल, सिंगापूर, तैपेई, वेलिंग्टन, मनिला आणि जकार्ता येथील देखील शेअर बाजारात घसरण झाली आहे.

व्याजदरवाढीवर दबाव

जगातील सर्वात मोठी बँक असलेल्या अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निश्चित समितीची बैठक २१-२२ तारखेला होणार आहे. मागील व्याजदरवाढीचा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. यामुळे यावेळी फेडरल रिझर्व्ह काय निर्णय घेणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे. फेडरल रिझर्व्ह यावेळी व्याजदरात २५ बेसिस पॉइंटची वाढ करण्याची शक्यता आहे.

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री

परदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर्सची विक्री सुरुच आहे. शुक्रवारी, परदेशी गुंतवणूकदारांनी १,७०० कोटी रुपये किमतीचे भारतीय शेअर्स विकले. यामुळे या वर्षातील FIIs कडून २३ हजार कोटी किमतीच्या शेअर्सची विक्री करण्यात आली आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news