Eco news : अर्थवार्ता : क्रेडिट स्युईसच्या आर्थिक संकटाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही

Stock Market
Stock Market
Published on: 
Updated on: 

गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये एकूण अनुक्रमे 312.85 अंक व 1145.23 अंकांची घट होऊन दोन्ही निर्देशांक 17100.05 अंक व 57989.9 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 1.8 टक्के तसेच सेन्सेक्समध्ये 1.94 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. गत सप्ताहात अमेरिकेतील महत्त्वाची बँक क्रेडिट स्युईस ही आर्थिक संकटात असल्याची बातमी आली. क्रेडिट स्युईसच्या आर्थिक संकटाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार काही परिणाम होणार नसल्याचा निर्वाळा अर्थ विश्लेषकांनी दिला. कारण भारतातील बँकिंग व्यवसायाच्या द़ृष्टीने या बँकेचा बारावा क्रमांक लागतो. एकूण बँकिंग व्यवसायापैकी क्रेडिट स्युईसचा व्यवसाय केवळ 1 टक्का आहे. आर्थिक अरिष्ट आल्याच्या बातम्यानंतर स्वीस नॅशनल बँकेने क्रेडिट स्युईसला 50 अब्ज स्वीस फ्रँक (सुमारे 53.7 अब्ज डॉलर्स)चे कर्ज देण्याचे जाहीर केले.

अमेरिकेची स्टार्टअप्सना वित्तपुरवठा करणारी आणखी एक बँक सिलिकॉन व्हॅली बँकने आर्थिक दिवाळखोरी जाहीर केली. दिवाळखोरीसंबंधी प्रकरणे हाताळणारी फेडरल डिपॉझिट इन्श्युरन्स कार्पोरेशन या अमेरिकन सरकारी संस्थेने सिलिकॉन व्हॅली बँकेच्या मालमत्तांवर टाच आणण्यास प्रांरभ केला. 2022 डिसेंबरच्या आकडेवारीनुसार सिलिकॉन व्हॅली बँकेकडे 209 अब्ज डॉलर्सची मालमत्ता आहे. तसेच 175.4 अब्ज डॉलर्सच्या ठेवी आहेत. सध्या सिलिकॉन व्हॅली बँक अमेरिकेमधील 16 व्या क्रमांकाची मोठी बँक आहे. केंद्र सरकारचे मंत्री चंद्रशेखर यांनी सिलिकॉन व्हॅली बँकेत पैसे अडकलेल्या 460 स्टार्टअप प्रमुखांची भेट घेतली व या बँकेतील ठेवींच्या बदल्यात भारतीय बँकांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात कर्जयोजना (क्रेडिट लाईन) सुविधा उपलब्ध करून देण्याचा इरादा जाहीर केला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील या घडामोडींचा परिणाम भारतीय भांडवल बाजारावर झाला. सप्ताहाअखेर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी बँक बुडवणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे तसेच ठेवीधारकांच्या ठेवी सुरक्षित राहणार असल्याचे आश्वासन दिल्यावर जगभरातील भांडवलबाजार पुन्हा सावरले.

बिसलेरी कंपनी विकत घेण्याचा टाटा कन्स्युमर प्रॉडक्ट कंपनीचा इरादा रद्द. बिसलेरीचे चेअरमन रमेश चौहान यांना एकूण 7 हजार कोटींची विक्री किंमत अपेक्षित असून, टाटा कंपनीच्या द़ृष्टीने हा महागडा सौदा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अखेर चार महिन्यांच्या वाटाघाटींच्या अपयशानंतर हा प्रस्ताव गुंडाळला गेला. सध्या बिसलेरीची उलाढाल 2500 कोटी असून 220 कोटींचा नफा मिळवण्यात कंपनी यशस्वी झाली.

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल या सरकारी संस्थेकडून एचडीएफसी लिमिटेड व एचडीएफसी बँक यांच्या एकत्रीकरणास (मर्जर) मान्यता. या एकत्रीकरणापश्चात एचडीएफसी लिमिटेडचे समभागधारक एचडीएफसी बँकेमध्ये 41 टक्क्यांचे हिस्सेदार असतील. एचडीएफसी बँक यानंतर 100 टक्के पब्लिक शेअर होल्डर कंपनी बनेल. एचडीएफसी लिमिटेडच्या संचालक मंडळाने 17 मार्च रोजी अपरिवर्तनीय रोख्यांद्वारे (नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचर्स) 57 हजार कोटींचा निधी उभारण्यास मंजुरी दिली. जुलैपर्यंत या दोन्ही कंपन्यांचे एकत्रीकरण प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. या सामिलीकरणाच्या सर्व परवानग्यांची पूर्ततता आता झाली आहे.

उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना (पीएसआय स्कीम) जाहीर झाल्यावर दोनच वर्षांत अ‍ॅपल कंपनीचे भारतात बनवलेल्या फोनची विक्रमी निर्यात आर्थिक वर्ष 2023 मध्ये 37 हजार कोटींपेक्षा अधिक किमतीचे अ‍ॅपलचे फोन भारतातून जगभरात निर्यात करण्यात आले. सरकारच्या अंदाजानुसार यावर्षी एकूण 75 हजार कोटींच्या फोन निर्यातीची अपेक्षा होती; परंतु आता यावर्षी 80 हजार कोटींपेक्षा अधिक किमतीची फोन निर्यात होण्याची शक्यता आहे. अ‍ॅपल कंपनीसाठी फोन बनवणार्‍या फॉक्सकॉन, मेगाट्रॉन, विस्ट्रॉन या कंपन्यांनी एकत्रितपणे पीएलआय स्कीमअंतर्गत 47041 कोटींच्या मोबाईल फोन उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे. अ‍ॅपल मोबाईल फोनच्या निर्यातीत मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावर्षी तब्बल 236 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. भारताच्या एकूण मोबाईल फोन निर्यातीत या आर्थिक वर्षात 75 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली तसेच फॉक्सकॉन अ‍ॅपल कंपनीचे एअरपॉड बनवण्यासाठी भारतात 200 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 1700 कोटी)ची गुंतवणूक करणार.

भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर राजेश गोपीनाथन यांचा राजीनामा. त्यांच्या जागी के क्रिथिवासन यांची नियुक्ती. गोपीनाथन हे टीसीएसमध्ये मागील 22 वर्षांपासून कार्यरत. मागील 6 वर्षांपासून एमडी व सीईओ नात्याने कंपनीची धुरा सांभाळली. मागील वर्षी मार्च 2022 मध्ये पुढील पाच वर्षे म्हणजे 2027 पर्यंत त्यांची पुनर्नियुक्ती झाली होती. परंतु वैयक्तिक कारणांमुळे व इतर संधीच्या शोधात राजीनामा दिल्याचे गोपीनाथन यांनी स्पष्ट केले.

क्रेडिट स्युईस बँकेच्या आर्थिक संकटामुळे पुन्हा आर्थिक मंदीच्या चर्चांना जागतिक पातळीवर सुरुवात. पुन्हा मंदी आल्यास खनिज तेलाची मागणी घटण्याचे संकेत मिळाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव 5 टक्क्यांनी कोसळून 75 डॉलर प्रती बॅरलखाली आले. डिसेंबर 2021 नंतरची ही सर्वात नीचांकी पातळी ठरली आहे. सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोर झाल्यानंतर या महिन्यात खनिज तेलाचे भाव सुमारे 10 टक्के पडले. अमेरिकेचे डब्लूटीआय क्रूड खनिज तेलदेखील 11 टक्क्यांपेक्षा अधिक कोसळून 67 डॉलर प्रती बॅरलपर्यंत खाली आले.

जानेवारी महिन्यात भारतातील घाऊक महागाईदर, 2 वर्षांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच 3.85 टक्क्यांपर्यंत खाली आला. तसेच फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाईदर (सीपीआय इन्फ्लेक्शन) 6.44 टक्क्यांवर खाली आले. अजूनदेखील किरकोळ महागाईदर रिझर्व्ह बँकेने ठेवलेल्या 6 टक्के लक्ष्याच्या (Target)पेक्षा अधिक आहे. रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाईदर 6 टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्याचे निश्चित केले आहे. मार्चपर्यंत किरकोळ महागाईदर 6 टक्क्यांखाली येण्याचा अर्थविश्लेषकांचा अंदाज आहे.

ह्युंदाई मोटर्स जनरल मोटर्सचा तळेगाव येथील वाहननिर्मिती प्रकल्प खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील. वार्षिक 1 लाख 65 हजार गाड्या निर्माण करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. हा प्रकल्प ताब्यात आल्यास ह्युंदाई मारुतीनंतर भारतातील सर्वाधिक वाहन उत्पादन करणारी आणि वार्षिक 10 लाख गाड्या निर्मिती करणारी सर्वात मोठी कंपनी बनेल. यापूर्वी जनरल मोटर्सने चीनच्या ग्रेट वॉल मोटर्ससोबत यासंबंधी बोलणी केली होती. 250-300 दशलक्ष डॉलर्समध्ये (सुमारे 2 हजार कोटी) व्यवहार होणार होता. परंतु बोलणी फिस्कटली. आता यामुळे जनरल मोटर्स ह्युंदाईसोबत कमी किमतीत करार करण्याची शक्यता आहे.

झी एंटरटेन्मेंट एंटरप्राईझेस इंडसिंड बँकेचे थकीत 83 कोटींचे कर्ज परत करण्याची शक्यता. कर्ज न फेडल्यास ह्युंसिंड बँक झी विरोधात दिवाळखोरी प्रक्रिया चालू करण्याच्या तयारीत होती. यामुळे झी आणि सोनी कंपनीचे 10 अब्ज डॉलर्सचे एकत्रीकरण (मर्जर) थांबले असते. आता कर्ज परत करण्याची तयारी दर्शवल्याने एकत्रीकरण प्रक्रियेचा मार्ग मोकळा होईल.

फोन पे कंपनीने 12 अब्ज डॉलर्स मूल्यांकनावर (Valuations) वॉलमार्टकडून 200 दशलक्ष डॉलर्सचा निधी उभा केला. यापूर्वी फोन-पेने व्यवसाय विस्तारासाठी 650 दशलक्ष डॉलर्सचा निधी उभा केला आहे.

10 मार्च 2023 अखेर संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 2.4 अब्ज डॉलर्सनी घटून 560 अब्ज डॉलर्स झाली. गत सप्ताहात शुक्रवारच्या सत्रात रुपया डॉलरच्या तुलनेत 17 पैसे मजबूत होऊन 82.59 रुपये प्रती डॉलर स्तरावर बंद झाला.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news