

कोपरगाव (नगर), पुढारी वृत्तसेवा: काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील तरुणांनी एका वयोवृद्ध म्हातारीच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल केला. त्यानंतर एक सत्य बाहेर आलं. व्हायरल व्हिडीओमधील ती वयस्कर महिला निघालीय एक नावाजलेली तमाशा कलावंत. शांताबाई लोंढे कोपरगावकर असं त्यांचं नाव. एकेकाळची लावणी सम्राज्ञी, जिच्या अदाकारीने आणि सौंदर्यानं चाळीस वर्षांपूर्वी अनेक तमाशा रसिकांना घायाळ केलं, ती महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी आता मात्र रस्त्यावर मिळेल ते खाऊन दिवस काढत आहे. बस स्थानकच तिचं घर झालं असून अत्यंत बिकट अवस्थेत ती जगत आहे.
एकेकाळी शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर यांच्या लावणी नृत्याने उत्तर महाराष्ट्र, खानदेश गाजवला. चाळीस वर्षांपूर्वी कोपरगाव येथील कर्मचारी अत्तार भाई यांनी 'शांताबाई कोपरगावकर' हा तमाशा काढला. शांताबाई लोंढे मालक झाल्या आणि पन्नास-साठ लोकांचे पोट भरू लागल्या. यात्रे-जत्रेत तमाशा प्रसिद्ध झाला, बक्कळ पैसा मिळू लागला. मात्र उतार वयात ना तमाशा राहिला ना पैसा. आता त्या उद्विग्न अवस्थेत शांताबाई भीक मागू लागल्या. पती नाही, ना कुणी जवळचं नातेवाईक. कोपरगाव बसस्थानकच शांताबाईचं घर झालं.
शांताबाईचे वय आज 75 वर्षे आहे. मात्र विस्कटलेले केस, फाटकी साडी, सोबत कपड्यांचे बाजके अशा अवस्थेतील शांताबाई बस स्थानकावर आजही 'ओळख जुनी धरून मनी' ही लावणी गात बसलेली असतात.
शांताबाई लोंढे या गेल्या काही वर्षांपासून कोपरगाव परिसरातच फिरत आहेत. पण त्या याच शांताबाई आहेत, याची कोणालाही माहिती नव्हती. काही दिवसांपूर्वी शांताबाई लोंढे या राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेश चिटणीस डॉक्टर अशोक गावितरे आणि चांदेकासारे येथील पीठ गिरणी व्यवसायिक अरुण खरात यांना अतिशय दुर्दैवी अवस्थेत कोपरगाव शहरात फिरताना आढळल्या. या वयोवृद्ध कलाकाराची ही दुरावस्था पाहून पक्षाच्या सांस्कृतिक विभागाने पुढाकार घेऊन 75 वर्षांच्या शांताबाई लोंढे यांच्या पुढील आयुष्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. तसेच सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांना हा विषय अवगत करून देत राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून लोंढे यांना एक लाखाची मदत व त्यांना घरकुल मिळवून देण्यासाठी विनंती केली. त्यावर पवार यांनी सकारात्मक पावले टाकण्यासाठी आश्वस्त केले.
हेही वाचा: