अहमदनगर : ‘पाटबंधारे’त तीन महिन्यांतच संशयकल्लोळ | पुढारी

अहमदनगर : ‘पाटबंधारे’त तीन महिन्यांतच संशयकल्लोळ

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम विभाग सहकारी संस्थेत सत्तांतराला तीन महिने उलटत नाही तोच विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यपद्धती विषयी तक्रारी सुरू झाल्या आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेत कर्जाची मर्यादा वाढविणे, ढोबळ नफ्यात वाढ होऊनही लाभांश कमी देणे, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा सभेतील सहभाग, अंदाजपत्रकातील 42 लाखांची वाढ इत्यादी वादळी विषयातील चर्चेत सभासदांच्या भावनांचा अनादर झाला.

तसेच विद्यमान चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी अधिकाराचा गैरवापर केल्याबद्दल त्यांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी संस्थेच्या काही सभासदांनी केल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी संस्थेच्या सचिव तसेच उपनिबंधकांच्या नावे असलेल्या तक्रारीत म्हटले की, 27 मे रोजी आमच्या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्यात संस्थेचे सन 2023-24 सालचे संभाव्य खर्चाचे अंदाजपत्रकास मंजुरी देणे. हा विषय घेण्यात आला होता. डेडस्टॉक या लेखाशिर्षवर दहा लाख ज्यादाचा खर्च मंजुरीस ठेवला होता.

याबाबत विद्यमान पदाधिकार्‍यांना सदर लेखाशिर्षावर वाढीव तरतूद करण्याचा हेतू काय? याबाबत विचारणा केली असता खर्च अद्याप झालेला नाही. याबाबत पुढील सर्वसाधारण सभेला उत्तर देऊ’ असे असंविधानिक उत्तर देण्यात आले. हे उत्तर कायदेशीर नाही. सदर संभाव्य खर्च अंदाजपत्रक मागील 3 वर्षाच्या वास्तविक खर्चापेक्षा 42 लाख रुपयांनी अधिक ठेवण्यात आले आहे. याबाबत विचारले असता चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी उत्तर दिले नाही. त्यामुळे संभाव्य खर्चाचे अंदाजपत्रकास बहूसंख्य सभासदांनी विरोध करून नामंजूर केला आहे. सदर विषय याप्रमाणेच सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तात नोंदविण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

संस्थेचा ढोबळ नफा साधारणतः 54 लाखांनी वाढलेला आहे तर लाभांश देखील सभासदांना वाढून देण्याची मागणी करण्यात आली. त्यावर चेअरमन यांनी उत्तर न देता विषय मंजुर करावा व पुढील विषय घेण्यात यावा, असे सांगितले होेते. विद्यमान चेअरमन यांनी 3 ते 4 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या काही ठराविक माजी पदाधिकारी व ठराविक सेवानिवृत्त सभासद यांना सभेस सत्कारासाठी आमंत्रित केले होते. वास्तविक सदर सभासदांचा सत्कारांचा कार्यक्रम संपल्यानंतर वार्षिक सभेपुढील कामकाज सुरु होणे अपेक्षित होते.

परंतु सदर सेवानिवृत्त सभासद व पदाधिकारी यांना चेअरमन यांनी सभेस उपस्थित राहून कामकाजात भाग घेण्यास परवानगी दिली ही बाब कायदेशीर नाही. यास विरोध केला असता, सभासदांचा विरोध झुगारून बेकायदेशीररीत्या सभा सुरु ठेवली व सभासदांनी केलेल्या सुचनांची कुठलीही नोंद घेतली नसल्याची तक्रारही नारायण तमनर, शांताराम तमनर, वैशाली साळवे, शकुंतला पवार, सलीम शेख, महेश रासकर, दिनेश पवार, पांडुरंग गरगडे, बाळासाहेब थोरात, दीपक अरगडे, राजेंद्र पिंपळे, सुनील भिसे, योगेश पवार, अनिल जरे आदींनी केली आहे.

27 मार्चला आमची सत्ता आली. त्यापुर्वीचा सर्व कारभार मागील मंडळाचा आहे. खरतरं यांना पराभव पचविता येईना. यांच्या तोंडाला रक्त लागले आहे. त्यामुळे सर्रासपणे चुकीचे आरोप करत आहेत. मात्र आपण यांच्या कृत्याचे बाड बाहेर काढल्यास फौजदारी होतील.

-किशोर गांगर्डे,
विद्यमान चेअमन

आमसभेचे प्रोटोकॉल पाळून सभा घेणे गरजेचे होते. मात्र तसे झालेले नाही. कर्ज रक्कम मर्यादा वाढीस एकमताने मंजुरी दिली होती, मात्र सत्ताधार्‍यांनी ती नाकारली. त्यामुळे नियमबाह्य सभा ठरवावी, अशी मागणी सभासद उपनिबंधक यांच्याकडे करणार आहे.

-अजय लखापती,
माजी व्हा.चेअरमन

हेही वाचा

श्रीरामपूर : हातभट्टी अड्ड्यांवर छापे; 10 जणांवर गुन्हे दाखल

आश्वी : शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळणार : महसूलमंत्री विखे

कोपरगाव : श्री गणेश कारखान्यास सहकार्य करणार : उपमुख्यमंत्री फडणवीस

Back to top button