

शेळगाव – पुढारी वृत्तसेवा
गोतोंडी (ता.इंदापूर) येथे गावठाणात गुरुवारी (दि २६) भर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका लांड्ग्याने शेळ्याच्या गोठ्यात हल्ला चढविली. या हल्ल्यात ३ ते ४ महिन्यांचे ४ बोकड व ३ शेळ्या असे ७ करडे मृत्युमुखी पडले असून, एक गंभीर जखमी झाले आहे.
अचानक भर दुपारी लांडग्याने हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहिती नुसार गोतोंडी गावठाणातील अनिल बाबु बिबे यांच्या घराजवळ असलेल्या गोठ्यात ही घटना घडली.
घटना समजताच गोतोंडी गावाचे सरपंच गुरुनाथ नलवडे व ग्रामपंचायत सदस्य किशोर कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन वन विभाग व पशुवैद्यकीय डॉक्टरांना फोन करून घटनेची माहिती दिली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव शेगर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली व ३ शेळ्या व ४ बोकड हल्लात मयत झाल्याचे सांगितले . गंभीर जखमी बोकडावर औषधौपचार करण्यात आले.
सरपंच गुरुनाथ नलवडे यांनी सांगितले कि, गोतोंडी गावाजवळ दोन्ही बाजूला मोठे वन क्षेत्र असून, या वनात विविध प्राणी आहेत. यामुळे वन विभागाने वन्यप्राण्यापासुन शेळ्या मेंढ्याचे, नागरिकांचे तसेच लहान मुलांचे संरक्षण होईल अशा ठोस उपाययोजना कराव्यात. शासन स्तरावरून अनिल बिबे या शेतकऱ्यांस नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी अशी मागणी देखील सरपंच गुरुनाथ नलवडे यांनी केली आहे. यावेळी अनिल बिबे, राजाराम राऊत,सतीश काशीद,युवराज पवार,प्रकाश मोरे उपस्थित होते.