‘सिंचन’ची आऊटसोर्सिंगमध्ये बनवेगिरी | पुढारी

‘सिंचन’ची आऊटसोर्सिंगमध्ये बनवेगिरी

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सिंचन मंडळाकडून काढण्यात येणार्‍या टेंडर्सवर शंका घेतल्या जाऊ लागल्या आहेत. कार्यालयात पुरेशी कर्मचारी संख्या असताना आऊटसोर्सिंगच्या नावाखाली कंत्राटी कर्मचार्‍यांसाठी टेंडर काढले जात असून या कर्मचार्‍यांच्या जवळपास निम्म्या पगारावर डल्‍ला मारण्याचे काम सुरू आहे. प्रचंड आर्थिक पिळवणूक होत असल्याने कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये खदखद निर्माण झाली आहे.

सिंचन मंडळाच्या अखत्यारीत असलेल्या विभागांमध्ये प्रचंड खाबुगिरी बोकाळली आहे. मलिदा लाटण्याचे वेगवेगळे फंडे अभियंते काढत असल्याचे निदर्शनास येत आहे. सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाने पूर्ण करून हस्तांतरित केलेल्या पाणी प्रकल्पांतील पाण्याचे नियोजन करणे हे सिंचन मंडळाचे प्रमुख काम आहे. त्यासाठी पुरेसा कर्मचारीवर्ग उपलब्ध आहे. असे असतानाही कर्मचार्‍यांची जादा रिक्‍त पदे दाखविली जातात. त्याचे अंदाजपत्रक बनवण्याच्या सूचना रावसाहेबांकडून खाली दिल्या जातात. जादा कमिशन मिळावे किंवा मोठा गाळा काढण्यासाठी अंदाजपत्रक अव्वाच्या सव्वा फुगवण्याची ताकीद दिली जाते. कंत्राटी कर्मचारी टेंडर काढण्यापूर्वी त्यातून जादा टक्केवारी किंवा मोठा गाळा काढून देणारा ठेकेदार गाठला जातो. टेंडर मिळवून देण्याच्या अटीवर रावसाहेब आणि ठेकेदारांमध्ये आर्थिक तडजोडी होतात.

त्यानंतर टेंडर प्रसिध्द केले जाते. यामध्ये दुसर्‍या कुणी टेंडर भरले तर ते बाद करण्यासाठी शक्‍कल लढविली जाते. दुसर्‍या ठेकेदाराच्या टेंडर अर्जात मुद्दाम त्रुटी काढल्या जातात. कागदपत्रे अपूर्ण असल्याचे कारण पुढे करत ठेकेदाराचे टेंडर बाद केले जाते. माघार न घेणार्‍या ठेकेदाराला धमकावलेही जाते. तरीही एखादा ठेकेदार अडून राहिला आणि त्याने टेंडर मिळविले तर त्याला नाहक त्रास दिला जातो. कामाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत त्याला कसलेही सहकार्य केले जात नाही. त्याच्यावर कारवाईचाही बडगा उगारला जातो. मात्र, टेंडर मॅनेज झालेच तर ठरल्याप्रमाणे रावसाहेबांच्या डिमांडची पूर्तता संबंधित ठेकेदाराला करावी लागते. रावसाहेबांच्या सुचनेनुसार कधी-कधी तर कंत्राटी कर्मचारी भरतीच्या टेंडरची जाहीर नोटीसही काढली जात नाही. तसे करण्यामागे या कामाची वाच्यता होत नसल्याचे कारण दडलेले असते. जाहीर नोटीस प्रसिध्द न केल्याने बिनबोभाटपणे टेंडर मॅनेज करुन आपल्या फेव्हरमधील ठेकेदाराला काम मिळवून देणे सोपे होते, अशी चर्चा जलसिंचन मंडळात आहे.

आऊटसोर्सिंग हे ठेकेदार पोसण्याचा आणि अभियंत्यांच्या खाबुगिरीचा मार्ग बनला आहे. पाटकरी, मोजणीदार, लिपिक अशी काही पदे या आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून कंत्राटी पध्दतीने भरली जातात. कंत्राटी कर्मचार्‍यांची आवश्यकता कमी असतानाही जादा रिक्‍त जागा दाखवून कर्मचारी भरले जातात. टेंडर प्रक्रियेचे सोपस्कार पार पडल्यानंतर रावसाहेबांचा रेट ठरतो किंवा महिन्याला ठेकेदाराकडून पाकिट पोहोच केले जाते. या खाबुगिरीची झळ अप्रत्यक्षपणे कंत्राटी कर्मचार्‍यांना बसते. संबंधित ठेकेदार कर्मचार्‍यांना कमी मानधन किंवा पगार देऊन रावसाहेबांचा महिन्याच्या महिन्याला खिसा गरम करीत असतो. ठेकेदार कर्मचार्‍यांच्या पगारातील 40 ते 50 टक्के रक्‍कम कापून अभियंत्याच्या टेबलागणिक पैशाचे वाटप करतो. जलसिंचन मंडळात आऊटसोर्सिंगच्या टेंडरमधूनही मोठे अर्थकारण सुरु आहे. या बनवेगिरीच्या प्रकारात उपअभियंत्यापासून वरपर्यंतचे अभियंते गुंतले आहेत. कामाचा पुरेसा मेहनतानाही मिळत नसल्याने कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये रावसाहेब व इतर अभियंत्यांच्याविरोधात उद्रेकाची भावना आहे.
(क्रमश:)

मुख्य अभियंता, सचिवांनी लक्ष घालण्याची मागणी

सिंचन मंडळात कुठल्या पदावर किती कर्मचारी काम करतात, त्यांच्यावर वर्कलोड किती आहे, रावसाहेबांनी टेंडर काढल्यानुसार त्या ठिकाणी कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे का, असेल तर कंत्राटी कर्मचारी किती काम करतात, आऊटसोर्सिंगचे टेंडर किती कोटींचे किंवा लाखाचे आहे, संबंधित कर्मचारी खर्चाच्या तुलनेत किती काम करतात, याचे ऑडिट होणे आवश्यक आहे. सिंचन मंडळाचे मुख्य अभियंता, मुख्य सचिवांनी याप्रकरणी चौकशी करावी. आऊटसोर्सिंगची आवश्यकता नसेल, तर दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Back to top button