

चेन्नई : वीजनिर्मिती करण्यासाठी पवनऊर्जा, सौरऊर्जा अशा पर्यावरणपूरक मार्गांचा वापर आता वाढला आहे. धरणावर जलविद्युत प्रकल्प निर्माण करून त्याद्वारेही वीजनिर्मिती केली जात असते. आता आयआयटी मद्रास येथील संशोधकांनी एक अशी प्रणाली विकसित आणि तैनात केली आहे जी समुद्राच्या लाटांपासून (Sea waves) वीजनिर्मिती करू शकते. 'सिंधुजा 1' नावाचे हे तंत्रज्ञान तामिळनाडूमधील तुतीकोरीनच्या किनार्यापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर संशोधकांनी तैनात केले आहे. या ठिकाणी समुद्राची खोली सुमारे 20 मीटर आहे.
सिंधुजा 1 सध्या 100 वॅट ऊर्जा निर्माण करू शकते. येत्या तीन वर्षांत एक मेगावॅट ऊर्जा निर्मितीसाठी तिचा विस्तार केला जाईल. हे तंत्रज्ञान बेटांसाठी उपयुक्त ठरू शकते, असे तज्ज्ञ सांगतात. या तंत्रज्ञानाद्वारे शहराला किंवा त्याचा छोट्या भागाला वीजपुरवठा करणे महागडे ठरू शकते. त्याऐवजी पारंपरिक ऊर्जास्रोत वापरणे स्वस्त असेल. मात्र, बेट आणि ऑफशोअर स्थळी ऊर्जा पोहोचवण्याचा खर्च हा लाटांद्वारे वीजनिर्मितीपेक्षा अधिक असू शकतो, असे संशोधनाचे नेतृत्व करणारे अब्दुस समद यांचे मत आहे. समद हे आयआयटी मद्रासच्या महासागर अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक आहेत.
सिंधुजा 1 प्रणालीमध्ये तरंगणारी बुई, एक स्पार आणि इलेक्ट्रिकल मॉड्यूलचा समावेश आहे. लाटा वर-खाली होत असातना बुई वर खाली सरकते. बुईच्या मध्यभागी छिद्र असून ते स्पारला त्यातून जाऊ देईल. लाटांमुळे हलू नये यासाठी स्पार समुद्राच्या तळाशी बसवण्यात आले आहे. मात्र, जेव्हा बुई हलते आणि स्पार हलत नाही तेव्हा लाटा दोघांमध्ये रिलेटिव्ह मोशन तयार करतात. या रिलेटिव्ह मोशनचा वीजनिर्मितीसाठी जनरेटरकडून वापर होतो. परंतु, ऑफशोअर स्थानावर अशी जटिल प्रणाली तयार करणे आव्हानात्मक ठरते. उदाहरणार्थ, पवन ऊर्जेपासून निर्माण होणार्या ऊर्जेच्या प्रमाणात दिवसभरात आणि वर्षभरात हवामान बदलासह चढ-उतार होत असते.
वेगवेगळ्या ऋतूंमध्ये लहरींची उंची बदलते. हवामान शांत असताना प्रणाली ऊर्जा निर्माण करत नसेल तर ठीक आहे. परंतु, प्रणाली खडबडीत हवामान सहन करू शकते याची खात्री करणे गरजेचे आहे. कारण खराब हवामानात जर ही प्रणाली वाहून जात असेल तर त्यामध्ये गुंतवणूक करण्यात काही अर्थ नाही, असे समद यांनी सांगितले. प्रणाली व्यवस्थित काम करते की नाही हे तपासण्यासाठी संशोधकांनी नोव्हेंबर महिना निवडला जेव्हा आयएमडीने तामिळनाडू राज्यातील जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला होता. या काळात प्रणालीने चांगल्याप्रकारे काम केल्याचे, समद यांनी सांगितले.
हेही वाचा