सिंधुदुर्ग: महाराष्ट्र-कर्नाटक सिमावादाचे सिंधुदुर्गात उमटले पडसाद कुडाळात मनसेचे आंदोलन | पुढारी

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र-कर्नाटक सिमावादाचे सिंधुदुर्गात उमटले पडसाद कुडाळात मनसेचे आंदोलन

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाचे तीव्र पडसाद सिंधुदुर्गात उमटले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी कुडाळ येथे कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ आंदोलन छेडले. यावेळी बेळगाव बस डेपोच्या बसवर जय महाराष्ट्र, मनसे, मराठी असा मजकूर लिहीत मनसेचे झेंडे लावले आणि कर्नाटक सरकारच्या भूमिकेचा निषेध केला.  यापुढे कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्र आणि मराठी भाषिकांवर अन्याय झाल्यास कर्नाटक पासिंगच्या गाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा मनसेकडून देण्यात आला.

सिमावाद गेले अनेक वर्षे सुरु असुन मराठी भाषिकांवर कानडी अन्याय करत आहेत. महाराष्ट्रातील मंत्र्यांना, बेळगावासिंह मराठी भाषीकांना भेटण्यासही विरोध करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्राच्या गाड्याही कर्नाटकात फोडण्यात आल्या. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळच्या गाड्या कर्नाटक सीमेपर्यंत जातात पुढे जात नाहीत. परंतु कर्नाटक शासनाच्या गाड्या बिना दिक्तत महाराष्ट्रात येत आहेत. याचा निषेध मनसेकडून करण्यात आला.

महाराष्ट्रावर आणि मराठी भाषीकांवर अन्याय होईल तेव्हा तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना भक्कम पणे त्याला विरोध करेल. आज फक्त निषेध व्यक्त केला आहे. परिस्थिती नाही सुधारल्यास कर्नाटक पासिंग गाड्या जिल्ह्यात फिरु देणार नाही असा इशारा या वेळेस महाराष्ट्र सैनिकांनी दिला आहे. कुडाळ डेपोत सायंकाळी बेळगाव डेपोची बस आली असता मनसैनिकांनी हे आंदोलन छेडले.

Back to top button