बुलडाणा नव्हे ‘बुलढाणा’ म्हणा; या मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार
बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मुख्यालय असलेल्या या शहराचा 'बुलडाणा' असा उल्लेख होत असला तरी, शासकीय गॅझेटमध्ये मूळ उल्लेख 'बुलढाणा' असाच आहे. त्यामुळे यापुढे 'बुलढाणा' असा शब्दप्रयोग व्यवहारात येण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. या मोहिमेची सुरूवात येथील जिल्हा प्रशासनाने स्वत:पासून केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या फलकावर तसा शब्दबदल ही नुकताच करण्यात आला आहे. त्यामुळे इतर प्रशासकीय कार्यालयांनाही तसे अनुकरण करणे क्रमप्राप्त असेल.
याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते म्हणाले, शासकीय गॅझेटमध्येही पूर्वीपासूनच 'बुलढाणा' असाच मूळ उल्लेख आहे. महाराष्ट्र शासन, एनआयसीच्या संकेतस्थळावर व नकाशावरही 'बुलढाणा' असाच उल्लेख आहे. मात्र अलिकडच्या काही काळापासून बुलडाणा शब्द प्रचलित झालेला आहे.
मूळ उल्लेखच प्रचलनात यावा असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. हळूहळू अन्य कार्यालयांचे नामफलक, कार्यालयीन कागदपत्रे, संगणकीय डाटा यामध्ये 'बुलढाणा' असा उल्लेख व्हायला सुरूवात होईल. व लोकांच्या व्यवहारातही हा शब्द रूढ होईल. जिल्हा प्रशासनाने यात नवीन कोणताही बदल केलेला नसून, मूळ जो उल्लेख आहे त्याचीच अंमलबजावणी करण्याची प्रशासनाची भूमिका असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

